जत, (प्रतिनिधी)-
मराठी भाषेत समृद्ध असे साहित्य आहे. त्याचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करा. आपणास यशापर्यंत जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी वाचन केले पाहिजे. असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन व मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आय.क्यु.ए.सी चे समन्वयक प्रा. डॉ. शिवाजी कुलाळ उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कवि कुसुमाग्रज, श्रीमंत रामराव महाराज व शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या परिसरातील म्हणींचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने म्हणींवर कार्यक्रम घेऊन म्हणींचे जतन व संवर्धन केले जात आहे, असे सांगून प्राचार्य ढेकळे पुढे म्हणाले कि, आपण बोलताना म्हणी व वाक्यप्रचार यांचा वापर केल्यास आपल्या बोलण्याला वजन प्राप्त होते. म्हणींच्या माध्यमातून नेमकेपणावर बोट ठेवता येते. छोट्या छोट्या म्हणीतून फार मोठा आशय प्रकट करता येतो म्हणून बोलताना म्हणींचा वापर केला पाहिजे असे सांगून ते शेवटी म्हणाले की, आपल्या भाषेचा अभ्यास करता करता इतर भाषेचाही अभ्यास केला पाहिजे. मातृभाषा ही संस्काराची भाषा असते. मानवाची जडण घडण ही मातृभाषेमुळेच होत असते. इतर भाषेतून आलेल्या शब्दांना मराठीतील पर्यायी शब्दांचा वापर करून आपण आपली मातृभाषा समृद्ध केली पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी मराठी विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी मराठी भाषेतील अनेक म्हणींचे वाचन करून त्यांचा अर्थ सांगितला. यावेळी मराठी विभागाच्या वतीने म्हणींच्यावर आधारित सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी प्रा. सौ. एन. व्ही. मोरे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. प्रवीणसिंह शिलेदार यांनी मराठी भाषादिन साजरा कारण्यापाठीमागील उद्देश सांगितला. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुमार इंगळे व शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिनकर कुटे यांनी केले.
No comments:
Post a Comment