Monday, February 4, 2019

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

जत,(प्रतिनिधी)-
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्‍वास घेतला. कर्करोगाने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. ते ७0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी न्या. मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

'कमांडर' आणि 'हॅलो इन्स्पेक्टर' या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर गायक-संगीतकार वासुदेव भाटकर यांच्या घरी ३ ऑगस्ट १९४९ मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. कॉलेज जीवनात स्विमिंग चॅम्पियन होते. तसेच खो खो या खेळात देखील ते पारंगत होते. १९७७ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ३0 वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची ६९ वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्यातील उत्साह कायम होता. काही दिवसांपूर्वीच ते 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत दिसले होते. 'द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका निभावली होती. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली. 'अर्शूंची झाली फूले' हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटके गाजली आहेत. १९७७ ला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९0 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्या संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा 'जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता

No comments:

Post a Comment