Monday, February 25, 2019

एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांची महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यासाठी निवड

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांची राज्य शासनाच्या जिल्हा परिषद सांगली आयोजित तीन दिवासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक विकसनशील ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील विकासाभिमूख मुद्यांचा अभ्यास करून आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचांना अभ्यास व्हावा यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिफारशीनुसार सांगली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील दोन सरपंचांची निवड केली जाते त्यामध्ये जत तालुक्यातील एकुंडी व कुंभारी या ग्रामपंचायतचे सरपंच यांची निवड करण्यात आली आहे.
तेथे विद्यापीठात परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम याबाबत प्रशिक्षणही होणार आहे. जिल्ह्यातील वीस सरपंचामध्ये त्यांचा समावेश आहे.
    राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेमधे लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल दिले जाणार  आहे. सन 2022 मधे सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामधे परवडणाऱ्या दरात घरकुल बांधकाम कसे करावे या विषयावर विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिवाय तेथे अत्याधुनिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी देखील केली जाणार आहे. 26 फेब्रुवारी वारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत ह्या तीन दिवसांचा रत्नागिरी, सिंधूदुर्ग,  राळेगणसिध्दी व हिवरे बाजार असा अभ्यास दौरा असणार आहे.
जत तालुक्यातील दोन सरपंचांची निवड झाली असून त्यात एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांच्यासह कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर व जिल्ह्यातील अनेक गावचे सरपंच आणि जिल्हा परिषद अधिकारी यांचा समावेश आहे.
   पाटील यांनी एकुंडी येथे लोकोपयोगी असे भरीव कामगिरी केली आहे. या शिवाय योग्य नियोजनाने एकुंडी गाव चिलारमुक्त (काटेरी झुडपे मुक्त) करून गाव विकासासाठी सर्व कामातील पुढाकार व त्यांच्या अनेक कामगिरीची दखल घेऊन त्यांची या दौऱ्यासाठी निवड केली आहे.

No comments:

Post a Comment