जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो त्याचा संवेदनशील अंतःकरणातून उमटलेला उत्स्फूर्त हुंकार म्हणजे कविता असते. ही संवेदना प्रत्येकाच्याच काळजात निर्माण होत असते. ही भावना खऱ्या अर्थाने व्यक्त आणि अभिव्यक्त व्हायला हवी, असे मत कवी रवी सांगोलकर यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य सेवा मंच, शेगांव च्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त शेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, कविवर्य कुसुमाग्रजांची कविता अशाच प्रकारे विविध सामाजिक पैलूंवर भाष्य करीत अभिव्यक्तीच्या माध्यमातून थेट मनाची पकड घेत काव्यानंद देते.
कवी लवकुमार मुळे म्हणाले, सामाजिक परिस्थितीचा लेखाजोखा योग्य पद्धतीने समाजासमोर यायला हवा. आपले मत व्यक्त करताना अपंग कवी महादेव बुरुटे म्हणाले, प्रत्येकाच्याच ह्रदयात एक ठिणगी सुप्तावस्थेत असतेच तिच्यावर फुंकर मारून तिला प्रज्वलित करायला हवे. त्यातून एक सुंदर शब्दाविष्कार जन्म घेईल.
यावेळी झालेल्या काव्य मैफिलीत लवकुमार मुळे, महादेव बुरुटे, रवि सांगोलकर यांचेसह अनेकांनी विविध स्वरूपाच्या कविता, वात्रटिका, चारोळ्या सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. पड रं पाण्या.. पड रं पाण्या.. या प्रसिद्ध कवितेच्या गेय गायनाने कवी लवकुमार मुळे यांनी वेगळीच उंची गाठली.
या कार्यक्रमात स्वागत जनसेवा वाचनालय शेगाव चे धनाजी पाटील, प्रास्ताविक प्रा. जाधव यांनी केले आणि आभार श्री. रणशिंगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment