जत,(प्रतिनिधी)-
विद्यार्थी आणि पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वाढत आहे. प्राथमिक स्तरावर ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही. एस. ढेकळे यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे इंग्रजी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘इंग्रजी विषय शाळेत शिकविण्याच्या विविध पद्धती’ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी विषयतज्ञ म्हणून विवेकानंद कॉलेज, कोल्हापुरचे प्रा.डॉ.सौ.श्रुती जोशी, प्रा.डॉ.जयंत कुलकर्णी व जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधाने उपस्थित होते. प्रारंभी प्रा. आर. डी. कारंडे यांनी एक दिवशीय कार्यशाळेचा उद्धेश सांगितला.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा शिक्षणपद्धतीत अवलंब केला पाहिजे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना जे जे मिळते ते ते जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना दिले पाहिजे, त्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी नेहमी अपडेट राहिले पाहिजे,असे सांगून प्राचार्य डॉ. ढेकळे पुढे म्हणाले कि, मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी इंग्रजी विषयाच्या निरनिराळ्या अध्यापन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.प्राथमिक स्तरापासुनच मुलांना सोप्या भाषेत इंग्रजीचे अध्यापन केले पाहिजे. त्यासाठीच राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने या नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
सदर कार्यशाळेस जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी भाग घेतला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना इंग्रजी विषय अध्यापन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.रामदास बनसोडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.विजय यमगर व शेवटी आभार प्रदर्शन प्रा.सागर सन्नके यांनी केले.
No comments:
Post a Comment