जत,( प्रतिनिधी)-
शिक्षक भरती प्रक्रियेत अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीनंतरही पात्र उमेदवारांना खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीचे दिव्य पार करावे लागणार आहे. त्याशिवाय एका जागेसाठी पाचऐवजी दहा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार असल्यामुळे या संस्थांना ही प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबविण्यासाठी मोकळे रान मिळाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
राज्यात पवित्र पोर्टलमार्फत खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये होणारी शिक्षक भरती ही केवळ मुलाखतीद्वारेच होणार असून, एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखत देणार आहेत. एकूण 30 गुणांची मुलाखत होणार आहे. याच गुणांच्या आधारे संस्थाचालक शिक्षकांची नियुक्ती करणार आहेत. खासगी संस्थांच्या भरतीत राज्य शासनास तसेच खासगी व्यक्तीस हस्तक्षेप करण्यास वाव राहणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची भीती शिक्षक भरतीस पात्र उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्र शाळा, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी. शिक्षकसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येईल. मात्र, खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठीचा सुधारित अध्यादेश शासनातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. या अध्यादेशामुळे शिक्षक भरतीस पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पवित्र प्रणाली लागू होणार नाही
स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक संस्था संचालित शाळा व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षणसेवक भरती आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षणसेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू होणार नाही.
शिक्षण सेवकांसाठी वयोमर्यादेची अट...
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षणसेवक पदी रुजू होण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा 38 वर्षे, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्षे राहणार आहे.
नोडल अधिकारी म्हणून संचालकांची निवड
पवित्र प्रणालीव्दारे करायच्या शिक्षणसेवक; तसेच शिक्षक भरतीसाठी, प्राथमिक शाळांसाठी प्राथमिक चेशिक्षण संचालक, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी माध्यमिकचे संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शिक्षक भरतीसंदर्भात येणार्या सर्व अडचणींचे निराकरण संबंधित नोडल अधिकारी आवश्यकतेनुसार शासनाच्या सहमतीने करणार आहेत.
शिक्षक भरतीसाठी शासनाकडून अर्हता निश्चित
राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांकरिता शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठीचा अध्यादेश शासनातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. अध्यादेशानुसार पहिली ते आठवीच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच डी. एड., बी. एड. अनिवार्य करण्यात आले आहे. तर नववी ते दहावीच्या शिक्षकांसाठी संबंधित विषयातील पदवी 50 टक्क्यांसह उत्तीर्ण आणि शिक्षणशास्त्र पदवी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसेच अकरावी, बारावीसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 50 टक्क्यांसह उत्तीर्ण आणि शिक्षणशास्त्र पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांना मात्र टीईटी उत्तीर्ण असण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment