Thursday, February 28, 2019

जालिहाळ परिसरातील 400 कुटुंबांना धान्यपुरवठा


येरळा प्रोजेक्टचा उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालिहाळ परिसरात 50 टक्केच पाऊस पडल्याने मार्च ते जुलै या पाच महिन्यांसाठी 400 कुटुंबांसाठी धान्य पुरवठा करणारा पाषाण पालवी उपक्रम राबवण्यात येत आहे. येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन या संस्थेने याचे संयोजन केले आहे. ज्वारी पाच किलो, तांदूळ तीन किलो, डाळ एक किलो, खाद्यतेल एक किलो, साखर एक किलो, चहा 200 ग्रॅम, मसाला-चटणी 250 ग्रॅम पाच महिन्यासाठी 400 जणांना वस्तूंचे किट देणे आवश्यक आहे.
या एका किटसाठीचा खर्च 660 रुपये आहे. 660 रुपये देऊन दोन कुटुंबासाठी पाच महिन्यांची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे. येरळा संस्थेचे जालिहाळ प्रकल्पात कार्यरत स्थानिक कर्मचारी, गरजूंपर्यंत हे किट्स पोहोचवण्याची जबाबदारी घेतील. जत तालुक्यातील जालिहाळ परिसरात 2018 मध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस पडला आहे. प्रतिवर्षी घरापुरती बाजरी, तूर, हुलगा, मटकी पिकवून वर्षभर उदरनिर्वाह करणार्या बहुतांश लहान शेतकर्यांच्या शेतात यावर्षी धान्य पिकलेच नाही. अशा लहान शेतकर्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतमजूर, ज्येष्ठ नागरिक, आजारी व दिव्यांग व्यक्तींना पुढील पाऊस पडेपर्यंत उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशा दुष्काळग्रस्त ग्रामस्थांना टी. बी. लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सांगलीतील इतर सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने 2013 साली पाचशे कुटुंबाना पाच महिने शिधा वितरीत करण्यात आला. पाच वर्षांनंतर या भागात पुन्हा दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. यासाठीपाषाण पालवीअंतर्गत 400 गोरगरिबांना मदत करायचे नियोजन आहे. अधिक माहितीसाठी येरळा प्रोजेक्ट सोसायटी, सांगली- मिरज रोड, सांगली, टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन, अभ्यंकर कॉम्पेक्स, आमराई रोड, सांगली, फोन नं.0233-2375374, 2328376 या ठिकाणी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment