Monday, February 18, 2019

जात्यावरच्या ओव्या,भूपाळ्या राहिल्या फक्त पुस्तकात!


जत,(प्रतिनिधी)-
पूर्वीची घरातील मोठी माणसे पहाटे लवकर उठायची. कोंबडा आरवला की, त्यांची पहाट व्हायची. त्याकाळी घरातल्या आजीबाईकडे कुठले घड्याळ असायचे? पण त्या नेमाने ठरल्या वेळेत उठायच्या. जाते मांडून पायलीभर ज्वारी तासाभरात दलून संपवायची. पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजूळ घरघर आणि घरातल्या आजीच्या कंठातून निघणार्‍या सुमधूर ओव्या सगळ्या घरादाराची काने तृप्त करायच्या. मात्र आज असे काहीच चित्र दिसत नाही. आधुनिक जीवनशैली, एकल कुटुंब पद्धतीत वाढ आणि उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे, या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे ओव्या,भुपाळ्या हद्दपार झाल्या आहेत.

पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला... राम या देवाला
दुसरी माझी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला ... कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला... विठ्ठल देवाला
संत जनेच्या मदतीला विठ्ठल धावला होता, असं सांगितलं जातं. मात्र त्या काळी घरातली आजी किंवा माऊली या ओव्या देवांच्या चरणी अर्पण करायची. त्या ओव्या अगदी मनमुक्त म्हणायच्या. दळता दळताच स्वत:लाच हरवायच्या. त्या काळातल्या आजीबाई किंवा घरातली माऊली त्यांच्या देवावरील श्रद्धा भाव,प्रेम त्यांच्या ओवीत आणि दळतानाच्या समर्पणात दडलेले असायचे. त्या काळी घरात भरपूर माणसे असायची. बाबा, काका, काकू,त्यांची मुलं असा मोठा गोतावळा असायचा.मात्र घरातली ही माय कसलीही कूरकूर न करता, सकाळी-संध्याकाळी लागणारे पीठ एकावेळेला दळायची.
अगदी मन लावून काम करणार्‍या अगोदरच्या स्त्रिया निरामय आयुष्य जगायच्या. काही घरात मोठी माणसेही वारकरी संप्रदायाशी संबंधीत असायची. गळ्यात तुळशीमाळा धारण करायची, केसरी गंधाचा टिळा कपाळी लावायची. आजोबा सकाळी लवकर उठायचे आणि उठा उठा सकळीक वाचे स्मरावा गजमुख असे गजाननाचे स्मरण सकाळच्या मांगल्याला भारून टाकायचे. आजोबांना भूपाळ्या पाठ असायच्या. यासाठी ते काही शाळेत गेले नव्हते. त्यांना ते मुखोद्गत होते. मात्र या ओव्या आणि भूपाळ्या आता आपल्याला पुस्तकाच्या पानांतच पाहायला मिळतात. त्यांचे महत्त्वही आता कुणाला स्मरत नाही. घरातील वडिलधारी स्त्रिया दळताना ओव्यांमध्ये आपल्या प्रत्येक सदस्याचे कौतुक करायचा. त्यांचे गुण वर्णन करायच्या. घरातल्या लोकांची पहाट आनंदमय जायची. सकाळी पक्ष्यांची किलबिल भारावून टाकायची. मात्र आज ना जाते राहिले ना ओव्या! भूपाळी तर कुठे तरी आळवली जायची. तीही आता लुप्त झाली आहे.

No comments:

Post a Comment