आज जाती-धर्म यांची सीमा आपल्या देशात रुंदावत चालली आहे.
त्यावरून आरक्षणाचे स्तोम माजत चालले आहे. ज्यांनी
राजकारणासह सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली, अशा जाती-धर्मांनादेखील आता आरक्षणाची निकड भासू लागली आहे. मोर्चे,
आंदोलने यांचा तर सातत्याने मारा सुरू आहे. यामुळे
अनेकदा आर्थिक व्यवस्थाही विस्कळित झाली आहे. देशाचे प्रचंड नुकसान
होत आहे, असे असतानाही कशाचीही फिकिर न करता विविध जाती-धर्म आरक्षणासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत. सरकारदेखील
मतांवर डोळा ठेवून आरक्षणासाठी शब्दांचा खेळ करीत, आरक्षणाची
खिरापत वाटत आहे. त्यामुळे देशात काय चालले आहे, असे म्हणण्यासारखी चिंताजनक परिस्थिती असताना एक चांगली बातमी आपल्यापर्यंत
पोहचली आहे. तामिळनाडू राज्यातील एक महिला देशातील पहिली जात-धर्म नसलेली महिला असे प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झाली आहे.
तामिळनाडू राज्यातल्या वेलूर गावची रहिवाशी
असलेल्या 35 वर्षांच्या स्नेहाने नुकतेच नो कास्ट,
नो रिलिजन असे प्रमाणपत्र मिळवले आहे. तिरुपत्तूरचे
तहसीलदार टीएस सत्यमूर्ती यांनी हे प्रमाणपत्र स्नेहाकडे सुपूर्द केले. आता तिला सरकार दप्तरी जात किंवा धर्म लावण्याची आवश्यकता लागणार नाही.
पेशाने वकिल असलेल्या स्नेहाने यासाठी तब्बल नऊ वर्षांची प्रतीक्षा केली
आहे. तिरुपत्तूर येथे वकिली करत असलेली स्नेहा याकडे सामाजिक
बदल यादृष्टीने पाहते. तिच्या म्हणण्यानुसार जात-धर्म असं काही नसतंच. आपण मनुष्य आहोत. या जातीधर्माच्या बेड्यांपासून हा देश मुक्त करायचा आहे, असेही ती म्हणते.
जात-धर्म नसलेला नागरिक हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली असली
तरी आता यापुढे अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फार प्रयास करावे लागणार नाहीत.
स्नेहामुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. स्नेहाला
हा अधिकार एका खास नियमाने मिळाला आहे.तिरुपत्तूरच्या उपजिल्हाधिकारी
प्रियंका पंकजम सांगतात की, हा एक अपवाद आहे.तहसीलदारांना हा अधिकार आहे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर
अशा प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाऊ शकते.
काही न्यायालयाच्या आणि सरकारच्या
आदेशानुसार कुणालाही प्रमाणपत्रांमध्ये जाती-धर्माचा उल्लेख करण्याबाबत
दबाव आणला जाऊ शकत नाही. स्नेहाचे आईवडील यांनी आपल्या तीनही
मुलींची नावे अशा प्रकारे ठेवली की, त्यामुळे जाती-धर्माची ओळख होईल. शाळेपासून आतापर्यंत सर्वच रकान्यात
फक्त भारतीय असाच उल्लेख करण्यात आला आहे. स्नेहाने आपल्याला
जाती-धर्म नसलेले प्रमाणपत्र मिळावे,यासाठी
2010 मध्ये अर्ज केला होता.यासाठी शाळेपासून अनेक
प्रकारच्या कागदपत्रांचा धांडोळा घेण्यात आला. स्नेहाचे पती प्रतिभा
राजा पेशाने तामिळ प्रोफेसर आहे. या दोघांनीही आपल्या मुलींची
नावे अधिरई नसरीन, अधिला झरीन आणि आरिफा अशी ठेवली आहेत.
खरे तर असे प्रवाहाविरुद्ध जगणं आजकाल
कठीण होत चाललं आहे. पण ही सिस्टीम बदलायचीही
आवश्यकता आहे.यासाठी कुणी ना कुणी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अशा अनेक स्नेहा या देशात जन्माला यायला हव्यात. आजच्या आरक्षणाच्या वाढत्या मागणीच्या काळात मी फक्त भारतीय आहे आणि मला कोणता
जात-धर्म नाही, हे सांगण्याचे कायदेशीर
धाडस स्नेहाने केले आहे. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत
मला पन प्रमाणपत्र हवे आहे
ReplyDeleteफक्त पुरुष हि जात असून मला भारतीय हेच प्रमाणपत्र पाहिजे आहे
ReplyDeleteकाय करावे लागेल असे