जत,(प्रतिनिधी)-
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश विठोबा जमदाडे यांची पुणे विभागीय रेल्वे बोर्ड संचालक पदावर निवड करण्यात आली आहे .सांगली ,सातारा, कोल्हापूर व पुणे चार जिल्ह्याचा या रेल्वे बोर्डात समावेश राहणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जत शहरासह तालुक्यातील प्रमुख गावात फटाके वाजवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
खासदार संजय पाटील यांनी प्रकाश जमदाडे यांच्या नावाची विभागिय रेल्वे बोर्ड समितीचे संचालक पदासाठी शिफारस केली होती .त्यानुसार जमदाडे यांची निवड करण्यात आली आहे .आमदार विलासराव जगताप व खासदार संजय पाटील यांच्या विश्वासाला पात्र राहून रेल्वे प्रवासी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहे अशी ग्वाही प्रकाश जमदाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून मिरज- जत - विजापूर या नियोजित रेल्वेमार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल व जत तालुक्यातील जतरोड ( वाळेखिंडी ) येथील रेल्वे स्थानकावर सर्व जलद आणि अतिजलद रेल्वे गाड्या थांबवून प्रवाशांची सोय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि जतरोड रेल्वे स्थानकावरून मुंबई येथे जाण्यासाठी जत व सांगोला तालुक्यातील नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही प्रकाश जमदाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मागील सतरा वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी काम करत आहे या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून मला हे पद देण्यात आले आहे .जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील प्रवासी नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment