Thursday, February 7, 2019

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करा- प्रा. पडोळकर

जत,(प्रतिनिधी)-
देशातील सध्य स्थितीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी ही अघोषित आणीबाणीचा एक भाग असून जनतेने या विरोधात आवाज उठवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करावा,असे आवाहन प्रा. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. ते कोसारी येथील राजे रामराव महाविद्यालय, जतच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या पाचव्या दिवशी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा बँकेचे सदस्य विक्रम सावंत होते.

     प्रा. पडोळकर पुढे म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. परंतु कालपरत्वे त्याची कशी गळचेपी केली जाते ते सोदाहरण स्पष्ट केले. मागील पाच वर्षांत तर कहर झाला असून विचारांची लढाई विचाराने करण्याऐवजी विचारवंतानाच संपवण्याची चढाओढ सुरू आहे. म. गांधी यांच्यासारख्या सत्य, अहिंसा, सदाचारी विचारसरणीच्या महात्म्याची आजही प्रतिकात्मक हत्या करून सनातनीे विचारसरणीचे लोक त्यांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन  घडवत असूनही प्रशासन अवाक्षर काढत नाही. तरूण वर्गाला रोजगार देण्याऐवजी गोहत्या, लव-जिहाद, जातीय तेढ निर्माण करून दंगलखोर बनवत आहे. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक धाडसाने व्यक्त होण्याचे आवाहन केले.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम सावंत म्हणाले, देश सध्या बिकट अवस्थेतून चालला असून बुद्धीजीवी व विचारवंताची मुस्कटदाबी केली जात आहे. तरुणांच्या बेकारीवर उपाययोजना शोधण्याऐवजी त्यांना भजी विकण्याचा सल्ला दिला जातो हे दुर्दैव आहे. मेक इन इंडिया ची कागदी घोषणा करून प्रत्यक्षात भकास इंडिया बनवणे सुरू आहे. तरूणांनी अन्याय सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे आवाहन शेवटी केले.
      कार्यक्रमास आकारामदादा मासाळ,नाथाजी पाटील, बाबासाहेब कोडग,काकासाहेब शिंदे, सलीम पाच्छापूरे,सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच  बाळासो पवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजेंद्र लवटे, डाॅ. भिमाशंकर डहाळके, प्रा. कृष्णा रानगर, सर्व सदस्य, ग्रामस्थ शिबीरार्थी उपस्थित होते.
    स्वागत व प्रास्ताविक कु. स्वाती खांडेकर, सुत्रसंचालन कु. गौरी राजेशिर्के यांनी केले तर आभार कु. संदिप वाघमोडे याने मानले.

No comments:

Post a Comment