जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ
कालव्यामधून व्हसपेठ तलावात पाणी येण्यासाठी दोन किलोमीटरचे काम लोकसहभागातून करण्यासाठी
शासनाने परवानगी द्यावी, यासह जत तालुक्यातील 46 गावांच्या सिंचनाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी झालेल्या पाणी परिषदेनंतर
गुरुवारी तपोवन रेवणसिद्ध चिक्कलगीचे तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जत तालुक्यातील पाणीप्रश्नासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माडग्याळसह आठ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करा, जत
पूर्वभागातील 46 गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही
योजनेतून तत्काळ पाणी द्यावे, जत तालुका दुष्काळी जाहीर झाला;
पण दुष्काळी सवलती किंवा सुविधांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही;
ती तत्काळ करण्यात यावी, दुष्काळी जत तालुक्यासाठी
विशेष पॅकेज जाहीर करावे, माडग्याळ शेळी- मेंढी पैदास केंद्र लवकर सुरू करावे, अशा मागण्या करण्यात
आल्या. सरकारने येत्या पंधरा दिवसांत सिंचनाच्या बाबतीत ठोस पावले
उचलावीत, आम्हाला लेखी आश्वासन द्यावे;
अन्यथा येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात
आला. यावेळी माडग्याळचे तुकाराम महाराज यांच्यासह संजय धुमाळ,
यशवंत राठोड, शकू मोरे, परशुराम
मोरे, दत्ता सावळे, सिद्धराया मोरे,
दामोदर धुमाळ उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री
प्रतीक पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणुकीत मतदान हा आपला अधिकार आहे. त्यामुळे निवडणुकीत
आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्यांना त्यांची जागा मतदानातून
दाखवा, असे आवाहन माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आंदोलकांना
केले. जत पूर्वभागातील 46 गावांच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्याची मागणी करणार आहे.
‘तुबची-बोबलेश्वर’बाबत काय स्थिती आहे, हे प्रशानाने स्पष्ट करावे;
अन्यथा ‘म्हैसाळ’मधून पाणी
देण्यासाठीचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment