Thursday, February 28, 2019

माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा राष्ट्रवादी काँगेसाचा राजीनामा

जत,(प्रतिनिधी)-
राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे .याबाबतचे निवेदन व राजीनामापत्र त्यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

       राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की , मी मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत होतो . पक्षाने लोकसेवा करण्याची संधी मला दिली होती त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे .  केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर  एस.बी.सी. , व्ही.जे.एन.टी. , ओ.बी.सी. या मागास प्रवर्गाच्या जातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी , व्हीजेएनटी व धनगर समाजाचे आरक्षण धोक्यात आलेले आहे  त्याच्या संरक्षणासाठी आणि बचावासाठी माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे . कोणत्याही पक्षाच्या चौकटीत राहून मला या मागास समूहाला न्याय देणे अशक्य होत असल्यामुळे व २५/२/१९ रोजी आझाद मैदान मुंबई येथील  या मागास समूहाच्या महामोर्चातील विविध संघटनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व माझ्यावर सोपवले आहे .त्यामुळे पक्ष सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत आहे. असे  असे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी मला पक्षामध्ये सन्मानाचे पद देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असेही त्यांनी या राजीनामा पत्रात शेवटी नमूद केले आहे.
    माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून काम करणार आहेत या संदर्भात त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क  होऊ शकला नाही .परंतु त्यांच्या निकटवर्तियांशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, ते आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात राहणार नाहीेत .लवकरच इतर पक्षात प्रवेश करणार आहेत असे त्यांनी सांगितले व नांव छापण्यास नकार दिला आहे.

No comments:

Post a Comment