जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व जनतेला राजकीय नेत्यांनी आजपर्यंत फसविले आहे . दहा किलो मीटर परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असतानाही ४६ गावांना अद्याप पाणी देण्यात आले नाही . दहा किलोमीटर कॅनाँलचे काम दोन महिन्यात पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर पूर्व भागातील गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे . परंतु शासनाकडून यासंदर्भात कोणतीही उपाय योजना किंवा ठोस आश्वासन दिले जात नाही .त्यामुळे सदरचे काम लोकवर्गणीतून पूर्ण करून घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी किंवा सदरचे काम शासनाने पूर्ण करावे असा ठराव माडग्याळ ( ता.जत ) येथील शेतकरी मेळावा आणि पाणी परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. अध्यक्षस्थानी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज होते.
राजकीय साठमारीत जत तालुक्यातील जनतेवर आजपर्यंत अन्याय झाला आहे. लोकवर्गणीतून जत तालुक्याच्या दक्षिण भागात पाणी आले म्हणून हत्तीवर मिरवणूक काढून पाणी पूजन कार्यक्रम घेण्यात आला . परंतु कार्यक्रम झाल्यानंतर पाणी बंद झाले आहे. दोनच दिवसात येतील नागरिकांची निराशा झाली आहे . निवडणूक आल्यामुळे म्हैसाळ योजना कार्यक्रमाला फाटे फुटत आहेत .तांत्रिक बाबी तपासून काम करावे व पाणी द्यावे . अशी येथील जनतेची मुख्य मागणी आहे. परंतु त्याकडे मागील साडेचार वर्षात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे.तालुक्यातील जनता आक्रमक झाल्याशिवाय यापुढील काळात पाणी मिळणार नाही . त्यामुळे राजकीय मतभेद विसरून पाण्यासाठी सर्वानी एकत्रितपणे काम करावे अशी भावना सर्वच वक्त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
माडग्याळसह या परिसरातील आठ गावाचा म्हैसाळ योजनेत समावेश करावा , पूर्व भागातील ४६ गावना शेती व पिण्यासाठी शाश्वत पाणी योजना राबविण्यात यावी , शासनाने येत्या पंधरा दिवसात आमच्या भावाना व मागणीचा विचार करून याबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहीस्कार टाकण्यात येईल , जत तालुका दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी त्या संदर्भातील उपाययोजना गतीने सुरू करण्यात आल्या नाहीत सदरच्या उपाययोजनाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी , दुष्काळाने उध्वस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने विशेष पॅकेज द्यावे , जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या माडग्याळी मेंढीचे संगोपन व जतन करण्यासाठी माडग्याळ येते संगोपन केंद्र विकसित करण्यात यावे इत्यादी ठराव यावेळी एकमताने संमत करण्यात आले.
तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत , जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवीपाटील , आक्कळवाडी बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद महास्वामीजी, जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पासाहेब बिराजदार , कृष्णदेव गायकवाड, महादेव अंकलगी , आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले . यावेळी तुकाराम माळी , बाबासाहेब कोडग , सोमनिंग बोरामणी , मंगल पाटील , एस. एस. वाली , सुरेश कटरे , राजू पुजारी , संजय तेली , शवरसिध्द दुधगी , बाळासाहेब गुरव , इत्यादी मान्यवर व पूर्व भागातील शेतकरी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment