Thursday, February 21, 2019

मानवाचा अतिरेक पर्यावरणाच्या मुळावर-डाॅ. राजेंद्र लवटे

जत,( प्रतिनिधी)-
मानवाच्या अतिरेकामुळे पर्यावरणाचा -हास जलदगतीने होत असून जैवविविधता धोक्यात आली आहे असे प्रतिपादन डाॅ. राजेंद्र लवटे यांनी जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित 'इतिहास आणि पर्यावरण' या विषयावर व्याख्यान देताना केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. व्ही.एस. ढेकळे  होते.

डाॅ. लवटे पुढे म्हणाले, मानवी लोकसंख्या वाढीमुळे नैसर्गिक स्तोत्रांचा वारेमाप वापर सुरू असून त्यामुळे अन्नसाखळी बिघडत चालली आहे. मानवी लोकसंख्येला आवर घातल्याशिवाय पृथ्वी वाचणार नाही. डाॅ. लवटे यांनी चित्रफितींच्या माध्यमातून पृथ्वी व जीवसृष्टी च्या उगमाचा इतिहास सांगून जैवविविधतेचा आढावा घेतला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी झालेल्या चळवळींचा इतिहास सांगितला. वनस्पती याच ख-या उर्जेच्या उत्पादक असल्याने जंगलतोड, वणवे रोखून वृक्षारोपण करून वनक्षेत्र वाढविण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी शेवटी आवाहन केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डाॅ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले की, इतिहास हा सर्व विद्याशाखांचा पाया आहे. कारण कोणत्याही ज्ञानशाखेत झालेल्या घटनांचा मागोवा इतिहासाच्या माध्यमातून घ्यावा लागतो.
यावेळी प्रा. सतीश दडस, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. पुंडलिक चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सतीश पडोळकर यांनी केले. आभार कु. निकीता काटे हिने मानले.

No comments:

Post a Comment