जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पुर्व भागातील नागरिकांना प्रत्येकवर्षी तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी व म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना किंवा कर्नाटकातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागण्यासह इतर विविध मागण्यांसाठी शेतकरी,ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. २७ फेब्रुवारी रोजी माडग्याळ ( ता.जत ) येथे शेतकरी मेळावा घेवून यासंदर्भातील निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात येणार आहे. अशी माहिती चिक्कलग्गी (ता. मंगळवेढा ) येथील भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यानी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी द्या,अन्यथा जत पूर्व भागातील ४२ गावाचे नागरिक आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला देण्यात येणार आहे. शेतकरी मेळावा नियोजनासाठी गावोगावी फिरून जनजागृती करण्यात आली आहे. माडग्याळ येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासाठी सुमारे पाच हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था मेळावा आयोजकानी केलीे आहे. या मेळाव्यास उपस्थित असणारे शेतकरी अंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहेत असेही तुकाराम महाराज यांनी यावेळी सांगितले.
सतत दुष्काळ पडत असल्यामुळे जत तालुक्याच्या पुर्व भागात असलेल्या ४२ गावातील शेतकरी,जनता मरणासन्नावस्थेत आहे. प्रतिवर्षी डिंसेबर पासून पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. शासन उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रूपय खर्च करत आहे .तरीही पुढील वर्षी तीच परिस्थिती कायम रहात आहे.पूर्व भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायच्या असेलतर सिंचन योजनेशिवाय पर्याय नाही. असे सांगून तुकाराम महाराज पुढे म्हणाले की , या भागात पाणी आणण्यासाठी शासनाने सिंचन योजना तयार करून पाणी आणले पाहिजे. त्यामुळे वेळ, पैसा याची बचत होवून नागरीकांची पाणी टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता होणार आहे.यासाठी जनता आता आक्रमक झाली आहे. सिंचन योजनेपासून वचिंत असलेल्या ४२ गावातील नागरिक संघर्षाला तयार झाले आहेत . प्रथम मतदानावर बहिष्कार, साखळी उपोषण, गांव बंद, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा इत्यादी प्रकारची अंदोलने सनदशीर करून या भागातील नागरिकांच्या भावना शासन स्तरावर पोहचविणार आहोत. असेही तुकाराम महाराज यानी यावेळी सांगितले.
शिवसेना जत तालुका प्रमुख अंकुश हुवाळे , उपप्रमुख तम्मा कुलाळ , माडग्याळ ग्रामपंचायत सरपंच इराण्णा जत्ती व अंबाण्णा माळी , शशिकांत माळी , महादेव माळी , जेटलिंग कोरे , गुरू माळी , व्हन्नाप्पा माळी , पांडुरंग माळी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment