गवाल्हेर:
पत्नीला पोटगी द्यायला लागू नये म्हणून कोर्टाकडे दयावया करून पतीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला खरा. पण त्यानंतर तिला घरी न नेता पतीने, सासर्याने व चार धाकट्या दिरांनी एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला बेदम मारहाण केल्यानंतर या नराधमांनी तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना ग्वाल्हेर येथे घडली आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित महिलेचे लग्न १४ फेब्रुवारी २0१५ साली गोल पहाडी भागातील तरुणाबरोबर झाले होते. पण लग्नानंतर सासरच्यांनी तिच्यामागे माहेराहून स्कॉर्पिओ गाडीसाठी पैसे आणण्याचा तगादा लावला. याबद्दल पीडितेने माहेरच्यांना कळवल्यानंतर वडील तिला माहेरी घेऊन आले. त्यानंतर पीडितेने पती व त्याच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. तसेच देखभाल खर्चासाठी त्यांनी कोर्टात खटला दाखल केला. त्यानंतर कोर्टाने पत्नीला ११ लाख रुपये पोटगी म्हणून द्यावे असे आदेश पतीला दिले. पण एवढे पैसे देणे शक्य नसल्याने पतीने व त्याच्या घरच्यांनी कोर्टात माफी मागत महिलेला आनंदाने नांदवण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनीही तडजोड करत तिला पतीच्या घरी जाण्यास सांगितले. यामुळे झाले गेले विसरून तीही पतीबरोबर जाण्यास तयार झाली. मात्र पतीने तिला घरी न नेता एका हॉटेलमध्ये नेले. पण तिथे रुमच उपलब्ध नसल्याने त्याने तिला नातेवाईकाच्या 'जस्ट क्लिक' या हॉटेलमध्ये नेले. तिथे गेल्यावर काही वेळाने सासरे व तिचे चार दिर तिथे आले. नंतर त्या सगळ्यांनी तिथे मद्यपान व जेवण केले. पण ते परत जात नसल्याने महिलेने याबद्दल पतीला विचारले. पण यावर त्याने, सासर्याने व दिरांनी तिला मारझोड करण्यास सुरुवात केली. ती अर्धमेली होताच चारही नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस म्हणजे ४८ तास ते तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. यामुळे तिला रक्तस्त्राव होऊ लागला व ती बेशुद्ध झाली. त्यानंतर पतीने तिला रुग्णालयात दाखल केले. पण पतीने अंमली पदार्थाचे इंजेक्शन दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.
त्या दरम्यान मुलीचा फोन लागत नसल्याने महिलेच्या वडिलांनी जावयास फोन केला असता ती फार आजारी असून रुग्णालयात असल्याचे त्याने सांगितले. नंतर वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली व पुन्हा मुलीच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर महिलेच्या पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.
No comments:
Post a Comment