Tuesday, February 12, 2019

बिळूर येथील काळभैरव देवाची यात्रा 18 पासून


जत,(प्रतिनिधी)
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिळूर (ता.जत) येथील श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत भरणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. नुकतीच प्रशासन आणि यात्रा कमिटी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी यात्रा सुरळित आणि शांतेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले.

श्री काळभैरवनाथ कमिटीच्यावतीने यात्रा नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यात्रेच्या मुख्य दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. यानुसार यात्रेची सुरुवात 18 फेब्रुवारीपासून होणार आहे. यादिवशी श्रीचे आगमन होणार आहे. दि. 19 रोजी नैवैद्य आणि 20 रोजी श्रीचा हरभंडी महोत्सव असणार आहे. दि.22 रोजी पालखी मिरवणूक होणार आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता यात्रा कमिटी आणि प्रशासन घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.ठोंबरे यांनी केले. यात्रा काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यात्रा कमिटी सज्ज आहे. यात्रेकरूंसाठी स्वच्छतागृहे, निवासाची व्यवस्था, श्रीच्या दर्शनाला गर्दी होऊ नये,यासाठी भाविकांना रांगेने दर्शन मिळणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. बिळूर गावाला आणि यात्रेसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी केसराळ तलावाखालील विहिरीचे अधिग्रहण करण्याच्या सूचना श्री.ठोंबरे यांनी दिल्या.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सोमनिंग जीवण्णावर, उपाध्यक्ष रामाण्णा भाविकट्टी, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पांढरे, ग्रामविकास अधिकारी आनंदा राठोड, विद्युत अभियंता श्री. राठोड, सरपंच नागू पाटील, पंचायत समिती सदस्य रामाण्णा जीवण्णावर, बसगोंडा कामगोंड, श्रीशैल कोटगोंड, सोमनिंगा मुडेगोल आदी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment