Thursday, February 21, 2019

छतावरील पाणी साठवा, दुष्काळ हटवा
जत,(प्रतिनिधी)-  
छतावर पडून वाया जाणारे पाणी बोअरवेलमध्ये साठविण्याचा उपक्रम अनेक शहरांमध्ये सुरू झालेला आहे. काही नगरपालिकांनी असे पाणी साठवणार्‍यांना घरफाळ्यामध्ये काही प्रमाणात सूट सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. या पद्धतीमध्ये घराच्या छतावर पडून वाहून ओढय़ाला किंवा नदीला मिळणारे पाणी हापशामध्ये किंवा बोअरवेलमध्ये जिरवले जाते. त्यामुळे वाया जाणार्‍या पाण्याच्या साने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वर येते. हा प्रयोग अनेकांनी केलेला आहे.

प्रयोग करण्यापूर्वी त्यांच्या हापशाला असलेले पाणी खोल गेलेले होते. ५0-६0 वेळा हापसल्यानंतर पाणी वर यायला सुरुवात होत असे. परंतु बोअरवेलमध्ये पाणी अशा पद्धतीने जिरवले, त्यामुळे पाण्याची पातळी वर आली आणि १0-१२ वेळा हापसताच हापशातून पाणी वर आले. याचा अर्थ पाण्याची पातळी वर आली असाच होतो. हा एवढा चांगला अनुभव असेल तर खरोखर आपण आजपर्यंत करोडो गॅलन पाणी वाया घालवलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. यासाठी करावयाची पद्धत सुद्धा साधारणपणे विहीर पुनर्भरणाच्या पद्धतीसारखीच आहे. मात्र त्यासाठी फार मोठा गाळण खड्डा घ्यावा लागत नाही.
छतावरच्या पाण्याच्या संकलनाला रूफ वॉटर हार्वेस्टींग असे म्हणतात. ते करताना बोअरवेलच्या जवळ १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १ मीटर खोल असा गाळण खड्डा खोदावा लागतो.
या गाळण कक्षाच्या साधारण १ फूट ते सव्वा फुटाच्या खालच्या थरात विटांचे तुकडे भरावे लागतात. त्याच्या वर एक नॉयलॉनची जाळी ठेवली जाते. त्या जाळीवर एक फूटभर वाळूचा थर द्यावा लागतो. एवढी व्यवस्था झाल्यानंतर हा खड्डा झाकणाने बंद केला जातो. आता आपण आजवर वर्षानुवर्षे दुर्लक्ष करून वाया घालवत असलेले छतावरचे पाणी एकत्र करायचे आहे. अनेकांच्या घरांना पत्र्यांचे छत असते आणि त्या पत्र्याचे पाणी पत्र्याच्या नळ्यामधून वहात जात असते. अशा पत्र्यांना एक आडवा पाईप लावावा. म्हणजे पत्र्याचे पडणारे पाणी त्या पाईपात जमा होते. त्या पाईपाच्या एका टोकाला ते पाणी जमा होईल. तिथून एक पाईप काढून तो या गाळण खड्ड्यापयर्ंत सोडला की, छतावरचे सगळे पाणी त्या गाळण खड्ड्यात जमा होते आणि गाळण खड्ड्यात गाळले जाऊन ते बोअरवेलच्या आसपास जमिनीत मुरते. त्या मुरलेल्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढते.
अनेक खेड्यांमध्ये पाणी पुरवठा योजना नाहीत. त्यामुळे लोकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. मात्र हे हाल कमी करणे इतके सोपे आहे हे लोकांना माहीत नाही. एखाद्या बोअरवेलच्या आसपास राहणार्‍या चार ते पाच घरांचे छपरावरचे पाणी एकत्र केले आणि ते अशा रितीने बोअरवेलमध्ये मुरवले तर त्या वस्तीला पाण्याची कधीही टंचाई जाणवणार नाही. इतके हे काम सोपे आहे. तरी सुद्धा लोक त्याचा अवलंब का करत नाहीत, याचे आश्‍चर्य वाटते. पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी लोकांना पाणी पुरवणे ही सरकारची जबाबदार नव्हती. पण आता प्यायचे पाणी सरकारनेच पुरवले पाहिजे, अशी लोकांची भावना झालेली आहे आणि पुढार्‍यांनी ती जास्त बळकट केली आहे. त्यामुळे आपण आळशी झालो आहोत. आपल्याच छतावरचे पाणी आपल्याच ङ्गायद्यासाठी किरकोळ खर्चांमध्ये बोअरवेलमध्ये जिरवता येते हे माहीत करून घेण्याची सुद्धा आपली तयारी नाही. एकदा हा मानसिक आणि शारीरिक आळस झटकला की, पाणी प्रश्न नावाचा हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. एकंदरीत सार सांगायचे झाले तर शेतकर्‍यांनी पाण्याच्या बाबतीत जागरुक राहण्याची गरज आहे. आपण आपल्या खिशातला पैसा जितक्या काळजीने वापरतो त्यापेक्षाही अधिक काळजीने शेतातले, विहिरीतले, तलावातले आणि धरणातले पाणी वापरले गेले पाहिजे. पैसा निर्माण करता येतो, पण पाणी निर्माण करता येत नाही. निसर्गाने दिलेली ही देणगी उधळ माधळ करून संपवून टाकली तर आपल्यावर पश्‍चाताप करण्याची वेळ येईल याचे भान प्रत्येक शेतकर्‍याने ठेवले पाहिजे. आजवर पाणी भरपूर मिळत होते. त्यामुळे कोणी काळजी करत नव्हते. पण आता मात्र पाणी कमी झाले आहे. त्यामुळे त्याच्या काटकसरीचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. मिळालेले पाणी काटकसरीने वापरणे आणि जे पाणी वापरता येत नाही ते जमिनीत जिरवून त्याचा जमिनीत साठा करणे या दोन उपायांची आपल्याला सातत्याने आठवण ठेवावी लागणार आहे. आपण शेतातल्या पिकांना खत देताना मोजून देतो. औषधे फवारताना मोजून फवारतो. पण पाणी देतानाच आपण त्याचा हिशोब करत नाही. पण तो हिशोब करायला आपण शिकले पाहिजे आणि त्यासाठी पाण्याची मापे, शेतातल्या पिकांना दिल्या जाणार्‍या पाण्याचे थर मोजण्याची मापे यांचे गणित शिकून घेतले पाहिजे. त्यासाठी पाणी मोजण्याची काही यंत्रे माहीत करून घेतली पाहिजेत.
पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये व्ही-नॉच प्रवाह मापक, फ्ल्यूम प्रवाह मापक आणि वॉटर मीटर अशी काही साधने वापरून पाण्याचा हिशोब केला जाऊ शकतो. त्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कोणत्या पिकाला किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन तेवढेच पाणी त्या पिकाला देता यावे या दृष्टीने सारे, सरीवरंबा आणि वाफे यांच्या रचना कशा कराव्यात याची माहिती घेतली पाहिजे आणि दिलेले पाणी पिकाच्या मुळालाच मिळेल, अन्यत्र जाऊन ते वाया जाणार नाही याबाबत दक्ष राहिले पाहिजे. केवळ वाफ्यांची शास्त्रशुद्ध रचना केल्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये २५ ते ३0 टक्के बचत होऊ शकते. शेवटी पाणी पिकाच्या मुळाला दिले पाहिजे आणि मुळाच्या खाली वाहून जाऊन जमिनीखालच्या खोलच्या थरात ते जाता कामा नये, अशी दक्षता घेतली पाहिजे. पाण्याच्या वापराच्या बाबतीत महाराष्ट्राने इस्रायलचे अनुकरण करणे आवश्यक आहे. इस्रायलमध्ये पाण्याचा थेंबा थेंबाचा हिशोब ठेवला जातो. त्याची माहिती शेतकर्‍यांनी जमेल तेथून करून घेतली पाहिजे. तशी तरी करून घेऊन त्या पद्धतीचा अवलंब आपण आपल्या शेतावर करणार नसू तर शेती व्यवसाय तर अडचणीत येईलच, पण उद्या आपल्या सर्वांना पेट्रोल पंपावर पेट्रोलप्रमाणे पाणी खरेदी करावे लागेल.

No comments:

Post a Comment