जत,(प्रतिनिधी)-
सई पेटकर ही अवघ्या नऊ वर्षांची चिमुरडी! पण आज याच चिमुरडीने स्केटिंगवर लावणीचा ठेका धरून आणि
प्रेक्षकांना धरायला लावून तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वंडर बुक, जिनिरस बुक, भारत वर्ल्ड
रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या या अनोख्या
कामगिरीची नोंद झाली आहे.
सांगलीतल्या नेमिनाथनगर इथल्या मैदानावर
एका तासात तब्बल अकरा लावण्या सादर केल्या. आता
तिच्या नावावर चार विक्रम नोंदवले गेले आहेत. सई शैलेश पेटकर
हिने पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या स्केटिंग लावणीला सुरुवात केली. मराठमोळं गाणं हे लाखमोलाचं सोन या लावणीवर उपस्थितांना मुजरा करीत तिने गिरकी
घेतली. त्यानंतर स्केटिंगच्या चाकावर तोल सांभाळत तिने उपस्थितांची
उत्सुकता वाढवली. ज्वानीच्या आगीची मशाल, दिसला गं बाई दिसला, मला लागली कुणाची उचकी, बुगडी माझी सांडली गं, आई, मला
नेसव शालू नवा, रेशमाच्या रेघांनी अशा लावण्यांवर न थकता तिने
आपली अदाकारी सादर केली आणि सांगलीकरांची वाहवा मिळवली. एका चिमुरडीचा
हा विक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. सतत काही तरी आणि नवं,
वेगळं करायला हवं,हे तिने आपल्या स्केटिंग लावणीनृत्यावरून
स्पष्ट केलं आहे.
No comments:
Post a Comment