जत,(प्रतिनिधी)-
जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणार्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना पहिले 3 क्रमांक मिळविणार्या खेळाडूंना 5 गुण तर विभागीय स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंना 10 गुण या पद्धतीने क्रीडा सवलतीचे गुण दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दिले जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
पूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण दिले जायचे. जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंना हे गुण मिळत नव्हते. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत होते. याबाबत क्रीडा संघटनांसह पालकांनीही संताप व्यक्त केला होता. दरम्यान, 20 डिसेंबर 2018 ला जाहीर झालेल्या शासन निर्णयात जिल्हास्तरीय, विभागीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 क्रमांकासाठी अनुक्रमे 3, 5, 7 गुण देण्यात आले होते. मात्र, हे अत्यंत कमी गुण असल्याने याबाबत नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे या गुणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. क्रीडामंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करताना जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत खेळणार्या विद्यार्थ्यांना समाधानकारक गुण जाहीर केले आहेत. जिल्हास्तरावरील स्पर्धेत पहिल्या तिन्ही क्रमांकांना 5 गुण देण्यात येतील.
विभागीय स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकाच्या खेळाडूंना 10 गुण मिळणार असून सहभागासाठी 5 गुण असतील. यासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 15 गुण असून सहभागासाठी 10 अथवा 12 गुण असतील. जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास 10 गुण व विभाग स्तरावरुन राज्यस्तरावर सहभाग असल्यास 12 गुण दिले जातील. राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकासाठी 20 गुण असून, सहभागासाठी 15 गुण मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्या खेळाडूंना 25 गुण पहिल्या तीन क्रमांकांना असून सहभागासाठी 20 गुण असणार आहेत. याबाबतचे शुद्धीपत्रक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केले आहे.
No comments:
Post a Comment