Tuesday, February 19, 2019

आंतरजातीय विवाह अनुदान मागणीत सातत्याने वाढ


जत,(प्रतिनिधी)-
आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जिल्ह्यातून  गेल्या दोन वर्षात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी 124 दाम्पत्यांनी प्रस्ताव दिला होता. यावर्षी 118 दांपत्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे आले आहेत. गेल्या पाच वर्षात 516 लाभार्थी दांपत्यांना 2.52 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

   आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य योजना राबवली जाते.1 एप्रिल 2010 पुर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या लाभार्थ्यांना 15 हजार रुपये, तर 1 फेब्रुवारी 2010 नंतर आंतर जातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग व्यक्तिपैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू ,जैन,लिंगायत ,बौद्ध ,शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केला असल्यास प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जातो. वाढू व वर या दोन्ही व्यक्ती मागासावर्गातील अनुसूचित ,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग  या प्रवर्गातील दोन वेगवेगळ्या प्रवर्गातील (आंतर प्रवर्ग) असल्यास अशा विवाहांना प्रोत्साहन अनुदान मिळते.
   जातीयता कमी करण्यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना आहे. अनुसूचित जाती (59 जाती), अनुसूचित जमाती, भटक्या जमाती अ, ब, क, ड (75 जाती), विशेष मागास प्रवर्ग (41 जाती) यापैकी एक व्यक्ती व सवर्ण हिंदू,  लिंगायत, जैन, बौद्ध, शिख यापैकी दुसरी व्यक्ती अशांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
प्रोत्साहन अनुदानासाठी 50 टक्के रक्कम राज्य शासन व 50 टक्के रक्कम केंद्र शासनाकडून उपलब्ध होते. यावर्षी 118 दाम्पत्यांचा अनुदानासाठी प्रस्ताव आले आहेत. गेल्यावर्षी 124,  2016-17मध्ये 90, 2015-16 मध्ये 132, 2014-15 मध्ये 86 आणि 2013-14मध्ये 84 दाम्पत्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अलीकडच्या पाच वर्षात प्रोत्साहन अनुदान मागणीसाठी हळूहळू संख्या वाढत आहे.

No comments:

Post a Comment