Thursday, February 28, 2019

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात


उमदी परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध;41 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देणार
जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून (शुक्रवार) मराठीच्या पेपरने सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील 103 केंद्रांवर 41 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 75 हजार विद्यार्थी बसले आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली; तर दहावीची परीक्षा आजपासून होत आहे. दहावीची 1 ते 22 मार्च या कालावधीत लेखी पेपर होणार आहेत. या परीक्षेसाठी 41 हजार 729 विद्यार्थी असून त्यांसाठी 103 परीक्षा केंद्रावर परीक्षेची व्यवस्था केली आहे. परीक्षाकाळातील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभाग दक्ष झाला असून उपद्रवी व कुप्रसिध्द केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, प्राचार्य-ज्येष्ठ व्याख्याता; तसेच विभागीय व्यवसाय मार्गदर्शन करणाऱे अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सात पथके कार्यरत करण्यात आली आहेत. परीक्षक व केंद्रसंचालक यांच्या नियुक्त्या करून नियोजन करण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील मालगाव, शिराळा तालुक्यातील शिराळा नंबर एक, वाळवा तालुक्यातील वाळवा आणि येलूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची अशी पाच उपद्रवी आणि मिरज तालुक्यातील एरंडोली, मिरज नंबर एक, वाळवा तालुक्यातील भवानीनगर, जत तालुक्यताील उमदी, कवठेमहांकाळ तालुक्यातील कवठेमहांकाळ अशी पाच केंद्रे कुप्रसिध्द आहेत. परीक्षेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे दक्षता पथकही नियुक्त करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात गैरवर्तन केल्यास आणि परीक्षाकामी अडथळा आणल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

No comments:

Post a Comment