Sunday, February 17, 2019

स्वप्नांच्या मागे धावणं हा मानवी मनाचा धर्म: पोतनीस

(जत येथील दत्त क्लासेसच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात प्रमोद पोतनीस मार्गदर्शन केले.)
जत,(प्रतिनिधी)-

युवकांनी स्वप्नांच्या मागे धावायला हवं
.त्यासाठी कष्ट,जिद्द, चिकाटीची जोड हवी. यातूनही यश मिळालं नाही तरी खचून न जाता दुसर्या स्वप्नांच्या मागे धावायला हवं. गप्प बसणं हा मानवी मनाचा धर्म नाही, असे प्रतिपादन रामराव विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक प्रमोद पोतनीस यांनी जत येथील न्यू दत्त क्लासेसच्या दहावी-बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या निरोप आणि शुभेच्छा समारंभात बोलताना केले.
     न्यू दत्त क्लासेसच्या दहावी-बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्याचा समारंभ नुकताच शिवनगर येथील क्लासेसच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी जत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. म्हेत्रे होते. यावेळी बोलताना श्री.पोतनीस म्हणाले की, आज ज्ञानाची कक्षा रुंदावली आहे. तसेच प्रलोभनेही वाढली आहेत. त्यामुळे युवकांनी सतर्क राहून जिद्दीने स्वत:चे करिअर करायला हवे. यासाठी कष्ट,चिकाटीही महत्त्वाची आहे.

     यावेळी लेखक व पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे म्हणाले की, युवकांनी राजकारण्यांच्या मागे न धावता कंपनीचा मालक होण्याचा सल्ला दिला.नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वत:ला अपडेट ठेवा. माजी नगरसेवक पापा कुंभार म्हणाले की, युवकांनी पहिल्यांदा करिअरकडे लक्ष द्यायला हवे. दहावी ते बारावी हा काळ भरकटण्याचा आहे, तो सावरण्यासाठी अभ्यास आणि करिअर याकडे लक्ष द्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक क्लासचे संचालक रामदास भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी कष्टाशिवाय पर्याय नाही,यावर जोर दिला.सूत्रसंचालन कु. शिफा नदाफ हिने केले. यावेळी आदर्श विद्यार्थी प्रथमेश जेऊर आणि आदर्श विद्यार्थीनी कु.श्रुती हिप्परगी यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार रासप विद्यार्थी संघटनेचा तालुकाध्यक्ष ओंकार बंडगर याने मानले. यावेळी शिक्षक म्हाळू एरंडे, दिगंबर मोरे, संजय शिंदे, महादेव बन्नी, सौ. देशमुख, सौ. नकाते, श्री. मठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Post a Comment