Friday, February 1, 2019

द्राक्षाला वातावरणाचा फटका

व्यापाऱ्यांनी दर पाडले
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.त्यातच पाण्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या दराने द्राक्षे विकत आहेत. साहजिकच द्राक्षाला दर मिळत आहे.

    यातच व्यापारी पाऊस पडण्याची भीती दाखवून द्राक्षे कमी दरात घेत आहेत. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी अवस्था झाली आहे. द्राक्ष बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे.जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    १४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पूर्व व दक्षिण भागातील २६ पैकी १७ तलाव व दोन मध्यम प्रकल्प मे-जून महिन्यापासून पाण्याअभावी कोरडे पडलेले आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडल्याने शेतकऱ्यांनी टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. सध्या दाक्षे विक्रीला आली आहेत.
     यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच बागा फुलोऱ्यात असताना, अवकाळी पावसाचा फटका बसला होता. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिली होती. शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा सामना करून द्राक्षबागा फुलवल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत वातावरण चांगले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय होत आहेत परिणाम...
सध्या द्राक्षे विक्रीला सुरुवात झालेली आहे. वातावरणातील बदलांमुळे विक्रीला आलेल्या द्राक्षातील गोडवा उतरू लागला आहे.कमी वजन भरत आहे. बेदाणा उत्पादन घटणार आहे. गोडी कमी होणार आहे. बेदाणा चपटा होणार आहे.
कच्च्या द्राक्षाच्या मण्यांवर आणि विक्रीला आलेल्या द्राक्षांच्या देठावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बागायतदार शेतकऱ्यांनी औषध फवारणी सुरू केली असल्याचे चित्र आहे.
     सध्या ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे व्यापारी शेतकºयांना सांगू लागले आहेत. याचा फायदा घेऊन कमी दरात द्राक्षांची खरेदी करण्याचा घाट व्यापाºयांनी घातला आहे. १८ जानेवारीपर्यंत ३८ रुपये किलो दर होता. सध्या ३२ ते ३४ रुपये आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर झाला आहे.
भूलथापांना बळी पडू नका
व्यापारी पावसाची भीती घालत आहेत. व्यापाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. कमी दरात द्राक्षाची विक्री करू नका, असे आवाहन द्राक्ष संघाच्यावतीने केले आहे.

No comments:

Post a Comment