Wednesday, December 19, 2018

लाचखोरांवरील कारवाईत पुणे विभाग अव्वल


जत,(प्रतिनिधी)-
जगभरात लाचखोरीचा विळखा घट्ट होत चालला आहे. जगातील 180 देशांत भारत 81व्या स्थानावर आहे, तर राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याची बाब समोर आली आहे. राज्यात पुणे विभागात चालू वर्षात लाचलुचपत विभागाकडून सर्वाधिक 179 सापळे रचण्यात आले. 

लाच देणे-घेणे हा  कायद्याने गुन्हा आहे. 1968 च्या मूळ कायद्यात आतापर्यंत अनेकवेळा सुधारणा करून हा कायदा अधिकाधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात आहे. नुकतेच जुलै 2018 मध्ये या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या. मात्र, कायदा कडक करूनही लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. आशिया खंडात भ्रष्टाचारात टॉप फाईव्ह देशांमध्ये भारत सर्वात आघाडीवर असल्याचे ट्रान्सपरन्सी इन्टरनॅशनल या संस्थेच्या 2017 च्या अहवालात म्हटले आहे. या पाच देशांपैकी भारतात लाचखोरीचे प्रमाण 69 टक्के आहे. या खालोखाल व्हिएतनाम (65%), थायलंड (41%), पाकिस्तान (40%) आणि म्यानमार (40%) या देशांचा क्रमांक लागतो. 
    महाराष्ट्रातही लाचखोरीचा आकडा मोठा आहे. राज्यात यावर्षी मागील आठ महिन्यात लाचलुचपत विभागाने 820 सापळे लावले, त्यात सुमारे एक हजार 87 सरकारी अधिकार्‍यांना अटक झाली. सरकारी कार्यालये लाचखोरीचे आगार असल्याची बाब या आकडेवरीतून पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे. सरकारी यंत्रणामंध्ये महसूल विभाग हा लाचखोरीत सर्वात पुढे असून, त्यापाठोपाठ पोलिसांचा क्रमांक लागतो. महसूल विभागाच्या विविध अधिकार्‍यांवर यावर्षी 201 सापळे लावण्यात आले; त्यात सुमारे 253 अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. मुंबई झोनमध्ये लाचलुचपत विभागाचे, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड हे आठ विभाग आहेत. यातील पुणे विभागात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सर्वाधिक प्रकरणे पुणे जिल्ह्यात नोंदली गेली आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली असा क्रम आहे. मुख्यत्वे शैक्षणिक संस्था, रुग्णालये, पोलिस, महसूल विभाग, अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था लाचखोरीची प्रामुख्याने केंद्रे आहेत, असा निष्कर्ष एका पाहणीतून काढण्यात आला आहे.



No comments:

Post a Comment