Wednesday, December 19, 2018

छत्तीसगड, राजस्थान,मध्यप्रदेश येथील यशाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला

जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीतील घवघवीत यशांने समस्त देशभरातील काँग्रेसला जणू नवसंजीवनी मिळाली आहे.  सांगली जिल्हयातीलही काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीचाही  या निवडणूकीमुळे चांगलाच आत्मविश्वास बळावला आहे. आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणारी विधानसभेची निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धारच दोन्ही काँग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे.

     मागील चार वर्षामध्ये विशेषतः केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केल्यानंतर किमान पहिली दोन वर्ष तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठया प्रमाणात  मरगळ आली होती.  राज्यभरातील सर्वच ठिकाणी दोन्ही काँग्रेसमधील  अनेक दिग्गज नेत्यांनी  भाजपा तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. यात सांगलीतील नेतेमंडळीचा समावेश होता. त्यामुळे एका बाजूला काही अपवाद वगळता  भाजपाने जिल्हयातील खासदारकी, आमदारकी यापाठोपाठ जिल्हा परिषद, महापालिका तसेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये झेंडा फडकावित सत्ताकेंद्रे काबीज करण्याचा अक्षरशः सपाटाच लावला. पक्ष  सोडून चाललेली नेतेमंडळी आणि सत्ताकेद्रे नाहीत. केवळ आंदोलनावर कार्यकर्त्यांना किती काळ एकसंघपणे बांधून ठेवायचे हाही प्रश्न होता. त्यामुळे काँग्रेसची मंडळी चिंताग्रस्त होती.
     भाजपाचा वारू कोणी रोखायचा हा प्रश्न दोन्ही काँग्रेसला सतावत असतानाच  अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानेच  भाजपाला जमिनीवर आणण्याचे मोठे काम केले. यामुळे देशभरातील काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत असलेल्या समविचारी पक्षांना आनंद झाला नसला तर नवलच.
   आगामी लोकसभा विशेषतः भाजपाच्या दृष्टीने अतिशय अटीतटीची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.  पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये सफाया झाल्याने भाजपाच्या पोटात गोळा  तर काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड  बळावला आहे.    भाजपा आणि काँग्रेसचा आता   खऱया अर्थाने लोकसभेला पहिला सामना  होणार आहे. लोकसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यात जमा आहे. दक्षिण महाराष्ट्रातील भाजपाने लोकसभेच्या ज्या ज्या जागा जिंकल्या आहेत. त्या जिंकण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आत्तापासूनच कंबर कसली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने दोन्ही काँग्रेसला जणू बारा हत्तीचे बळ आले आहे. मध्यप्रदेश , राजस्थान, छत्तीसगड मध्ये सत्तांतर होऊ शकते तर आपल्याकडे का नाही. असा प्रश्न आता काँग्रेसचे लोक उपस्थित करताना दिसत आहेत.एकूणच मरगळ आलेल्या दोन्ही काँग्रेसमध्ये जान आली आहे. आत्तापर्यंत छोटया मोठया आंदोलनाच्या माध्यमातून तग धरून राहिलेल्या दोन्ही काँग्रेसने आता थेट लोकांच्यात जाऊन निवडणूकीसाठी वातावरणनिर्मिती करण्याचे ठरविले आहे.
   आगामी लोकसभेच्या अगोदर व त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीदरम्यान जिल्हयातील काही बडी मंडळी भाजपा सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत होती. पण  पाच राज्याच्या यशानंतर भाजपातील संभाव्य पक्षप्रवेशाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. विशेषतः दोन्ही काँग्रेसमधील अनेक मंडळी आता  त्या त्या पक्षातच थांबतील असे दिसते. लोकसभेसह आगामी सर्वच निवडणूकामध्ये दोन्ही काँग्रेस अतिशय आक्रमकपणे सामोरे जाण्याचे ठरविले आहे. यापुर्वी ज्या काही चुका झाल्या त्यावर विचार करून दोन्ही काँग्रेसची मंडळी निवडणूकीच्या तयारीला लागली आहेत. त्यामुळे जिल्हयात काटयाची टक्कर पहावयाला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment