भीषण पाणीटंचाईमुळे पावसाळा व हिवाळ्यातच भटकंती
जत,(प्रतिनिधी)-
जत,(प्रतिनिधी)-
वाया गेलेला खरीप हंगाम, न झालेल्या रब्बीच्या पेरण्या,
पाण्यासाठीची गावोगावी होत असलेली भटकंती, जलसंधारणाबाबतीत
निर्माण झालेली सजगता या पार्श्वभूमीवर सरते वर्ष कायम स्मरणात
राहील ते न भूतो न भविष्यति अशा भीषण दुष्काळाचे वर्ष म्हणूनच. यंदा भीषण दुष्काळा सामोरे जावे लागत आहे.
1972 चा दुष्काळ विस्मरणात जावा किंबहुना त्यापेक्षा भीषण अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करतानाच सरत्या वर्षाचा निरोप घेतानाच नवे वर्ष कसे असेल याचा अंदाज येत आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता, त्यामुळे यंदाही कमी अधिक का होईना पाऊस होईल ही अपेक्षा शेतकरी बाळगून होता. त्यातच हवामान विभागाने सर्वसाधारण पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला होता. मात्र झाले उलटेच! सरासरी पर्जन्यमानाच्या केवळ तीस टक्के पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चार्यापर्यंतच्या प्रश्नाने आपले गांभीर्य दाखविण्यास ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या सप्ताहापासूनच सुरूवात केली आहे. अपुर्या व अनियमित पावसाने खरीप हंगाम वाया गेला तर पावसाअभावी रब्बीच्या पेरण्याच होऊ शकल्या नाहीत.
1972 च्या दुष्काळात रब्बीच्या पेरण्या
झाल्या होत्या परंतु नंतर पाऊस न पडल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागले होते.
त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नव्हता
पण अन्नधान्याची टंचाई होती. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
दुष्काळाची तीव्रता वाढीस लागली की पाण्याची मागणी वाढू लागली.
म्हैसाळ उपसा योजना जतच्या एका कोपर्यातून सांगोल्याकडे
गेली असली तरी या भागातील सुमारे 13 तलाव भरून घेण्याचे काम सुरू
आहे. जत शहराला पाणी पुरवठा करणार्या बिरनाळ
तलावाकडे मात्र हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. या तलावात
फारच कमी पाणी आहे.
यल्लमा यात्रा जवळ आली आहे,या यात्रेत पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे,मात्र नगरपालिका आणि प्रांत विभाग प्रशासन अजून काहीच निर्णय घ्यायला तयार
नाही. बिरनाळ तलावात तातडीने पाणी सोडल्यास जत शहर आणि यात्रेच्या
काळातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. म्हैसाळ पाणी आता सनमडीपर्यंत पोहचले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
हेच पाणी उमदीपर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक काळात
याचा लाभ भाजप उचलण्यासाठी प्रयत्नशील आहे.
याशिवाय अनेक गावातील ओढे, बंधारे, पाझर तलाव या पाण्याने
भरून घेतल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकते यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
सध्या जत तालुक्यात मंदगतीने का होईना, आवर्तन
सुरू असले तरी राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचा
संशय सर्वसामान्यांच्या मनात घर करून बसला आहे. तुबची-बबलेश्वर या कर्नाटक राज्यातील योजनेतून जतच्या पूर्व
भागातील 42 गावांना पाणी मिळवण्यासाठी जी धडपड सत्ताधारी आणि
विरोधक यांच्यात होत आहे,त्यावरून निवडणूक जवळ आल्याचे स्पष्ट
संकेत मिळत आहेत. पंचवार्षिक निवड्षणूक येऊ घातल्याने अनेकांना
आता जाग आली असून सध्या प्रत्येकजण पाण्याबाबतच बोलताना दिसत आहे.
तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळाले
नाही तर म्हैसाळ योजना पर्याय असल्याचे नुकतेच खासदार संजय पाटील यांनी म्हटले आहे.
अर्थात जत तालुक्यात योजनेची कामे सुरू आहेत. आता
लोकांना कृष्णेचे पाणी जत तालुक्यात येणार असे वाटू लागले आहे. बर्यापैकी नियोजित कामे सुरू झाली आहेत. मात्र सध्या जी पाणीटंचाई आणि जनावरांच्या चार्याचा
प्रश्न निर्माण झाला आहे,याकडे अधिक लक्ष
देण्याची गरज निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment