Wednesday, December 19, 2018

तुबची- बबलेश्वरच्या पाण्यासाठी कर्नाटकसोबत आठ दिवसांत बैठक

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 
जत,(प्रतिनिधी)-
जतच्या राजकीय पटलावर तुबची-बबलेश्वर या कर्नाटक राज्याच्या पाणी योजनेतून जतला पाणी मिळवण्यासाठी जतच्या राजकीय मंडळींची धडपड जोरात सुरू आहे. परवा याच शिष्टमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेतली होती . आता याच मंडळींनी मुंबईत जाऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन पाण्यासाठी त्यांच्याकडे विनंती केली. मंत्री महाजन यांनी आठ दिवसांत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांशी बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील 42 गावांना वरदान ठरणाऱ्या तुबची बबलेश्वर योजनेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे मंत्र्यांची येत्या आठ दिवसात तालुक्यातील गुड्डापुर येथे बैठक घेऊ,असेही स्पष्ट केले.

 
कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्याच्या सीमेपर्यंत सोडले आहे हेच पाणी नैसर्गिक प्रवाहतून जतला आणणे सोयीचे आहे, यासंदर्भात बुधवारी मुंबईत सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जतच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. रवींद्र आरळी,सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी,संजय तेली, सोमनिग बोरामणी , साब्बू करजगी आदी नेते उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनही देण्यांत आले.
    मंत्री  महाजन म्हणाले की जत तालुक्याच्या दुष्काळाला वरदान ठरणाऱ्या तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी देण्यासाठी राज्य सरकारचा विचार सुरू आहे मागे कर्नाटक व महाराष्ट्र सरकार यांच्यात पत्रव्यवहार झाला होता त्यामुळे यंदाच्या दुष्काळात जत तालुक्याला दिलासा देण्यासाठी येत्या आठ दिवसात दोन्ही राज्याच्या पाटबंधारे मंत्र्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू.
   यावेळी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले की गेल्याच आठवड्यात आम्ही बेळगाव येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन कर्नाटकातील तब्बूची बबलेश्वर योजनेमधून जत तालुक्याच्या पूर्व भागातील 42 गावांना पाणी द्यावे अशी मागणी केली होती. यावेळी कर्नाटक सरकार देखील जतला पाणी देण्यास तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.  त्यामुळे दोन्ही राज्यांचा पाणी वाटपाचा आंतरराज्य करार झाल्यास जत तालुक्याचा पाण्याचा मोठा  प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल. शिवाय 42 गावासह 13 ते 14 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन या भागातील सर्व शेतकरी आर्थिक सक्षम होतील , अशी माहिती रवि पाटील यांनी दिली.
     सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची मध्यस्थी 
जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळावे यासाठी शेजारील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे बुधवारी त्यांनी मंत्रालयात गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत हा विषय पोचवत रेटा लावला यामुळे हा प्रश्न लवकरच सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment