जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगाव आणि वाळवा तालुक्यातील कुरळप येथील दरोडय़ाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जत आणि रायबाग येथील आंतरराज्य टोळीतील तिघा पारध्यांना जेरबंद करण्यात आले असून 13 हजारांची रोकड आणि 11 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक केलेल्यामध्ये रायबाग येथील एका सराफाचाही समावेश आहे.
जत तालुक्यात उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना माडग्याळ येथे दरोडेखोरांची एक टोळी दरोडय़ाच्या तयारीत थांबली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयित गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी क्रूझर गाडी जतच्या दिशेने पळवली. थरारक पाठलागात क्रूझर कोळीगिरी येथे उलटली. त्यावेळी दत्ता रामू चव्हाण वय 24 आणि दिगंबर रामू चव्हाण वय 20 या दोघांना पकडले. तर अन्य दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते.
गाडीत देशी विदेशी दारूचे 28 बॉक्स सापडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता माडग्याळ येथील युवराज बारवर दरोडा टाकून तीन लाखांची दारू पळवली असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जत, उमदी, अथणी, कागवाड, आदी भागात फिरून दरोडयातील आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली. दरोडयातील साहित्य रायबाग येथील सराफाला विकण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली.
पथकाने रायबाग येथे शिवाजी उत्तम काळे वय 42 रा. अमित मिल शेजारी गुडमुडशिंगी जिल्हा कोल्हापूर आणि आकाश आप्पा चव्हाण वय 20 रा. उमराणी रोड पारधी तांडा जत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोने खरेदी करणारा मंजूनाथ गुरूनाथ वेरणेकर वय 28 रा. दत्तमंदिर रायबाग यालाही अटक करण्यात आली. या टोळीने कुरळप आणि जत येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, या टोळीने जत तालुक्यातील शेगाव येथे 21 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घराचा दरवाजा फोडून तीन लाख रोख आणि सोन्याचे दागिने असा चार लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केल्याची कबुली दिली आहे. तर मे महिन्यात कुरळप पोलीस ठाण्याच्या हद्ती सुशिला आनंदा कांबळे यांच्या घरात प्रवेश करून तिचे हातपाय बांधून सात तोळयाचे दागिने लंपास केले होते. तर 30 मे रोजी ऐतवडे खुर्द ता. वाळवा येथील प्रकाश निवृत्ती सूर्यंवंशी यांच्यासह पत्नीला मारहाण करून दागिने आणि रोकड असा 45 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली आहे.
कर्नाटक आणि सांगली कोल्हापूर जिल्हय़ातील दरोडेखोरांनी संयुक्त टोळी तयार केली आहे. रायबाग हे या टोळीचे केंद्र आहे. रात्री दहा वाजता रायबाग येथे एकत्र यायचे. सराफ भाडयाची गाडी घेऊन यायचा आणि पहाटे चार वाजेपर्यंत दरोडा टाकून परत रायबागला पोहोचायचे अशी या टोळीची दरोडयाची पध्दत असल्याची माहिती पोलीस प्रमुख शर्मा यांनी दिली.
अनेकदा चोरीचे दागिने विकत घेतल्याबद्दल सराफांना अटक अथवा ताब्यात घेण्याचे प्रकार घडतात. पण या टोळीतील वेरणेकर हा सराफ स्वतःच दरोडेखोरांच्या टोळीच्या गाडीचे सारथ्य करत असल्याचे पुढे आले आहे. दहा रूपये प्रतिकिलोमीटर दराने गाडी भाडयाने घेऊन तो स्वतःच गाडी चालवायचा. आणि दरोडयातील सोनेही स्वस्तात खरेदी करायचा त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.
यावेळी स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते. गुंडा विरोधी पथकाचे सपोनि विशाल पाटील, अमितकुमार पाटील, प्रविण शिंदे, शरद माळी, जितेंद्र जाधव, अमित परिट, अशोक डगळे, बिरोबा नरळे, राजू मुळे, राजू शिरोळकर, सागर लवटे, संजय कांबळे, सुधीर गोरे, संदिप गुरव, राहुल जाधव, निलेश कदम, विजय पुजारी, संजय पाटील, सुनिल लोखंडे, अनिल कोळेकर, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन सूर्यवंशी, अरूण सोकटे यांनी ही कामगिरी केली.

No comments:
Post a Comment