Saturday, March 2, 2019

कूलरबरोबरच वातानुकूलित यंत्रणांनाही मागणी वाढली


जत,(प्रतिनिधी)- 
अलिकडच्या काही वर्षांत तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उन्हाळा असाहाय्य होत चालला आहे. पूर्वी ग्रामीण भागात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडांखाली किंवा गार वार्‍याच्या सानिध्यात आसरा घेतला जात होता तर शहरांमध्ये पंख्याचे गरम वारेही सहन केले जात होते. मात्र जागतिक उदारीकरणानंतर या परिस्थितीत बदल होत  चालला आहे. 2012 पासून भारतातील चारही विभागात कूलरच्या विक्रीत दरवर्षी 27 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर आता गेल्या चार-पाच वर्षात  वातानुकूलित यंत्रणांनाही मागणी वाढली असून या व्यवसायात सरासरी 10 टक्के वाढ नोंदली जात आहे.
सध्या जो ऑनलाइन बाजार देशात भरला आहे यात अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्या उतरल्या असून येथे उन्हाळा हंगामात कूलर व एअर कंडिशनरला खूप मागणी असल्याचे दिसून आले आहे. कंपन्यांची स्पर्धा असल्याने कमी दरात ही यंत्रे घरपोच होत असल्याने शहरी भागाबरोबरच लहान शहरांमध्ये ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. कूलरमध्ये घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा प्रकारात कूलर मिळतात. यासाठी अनेक नामांकित कंपन्या पैसा गुंतवित आहेत. भारतात या क्षेत्रात सध्या बजाज, क्रॉम्पटन, ओरिएंट, उषा, महाराजा, खेतान, राम, केनस्टार, सिंफनी, मॅकॉय या कंपन्यांचा बोलबाला आहे. बाजारात रूम, डेझर्ट व टॉवर हे कूलर उपलब्ध आहेत. भारतात मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जगभरातील कंपन्यांचे येथील बाजारावर लक्ष आहे. सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. याचा फायदा कूलर व वातानुकूलित कंपन्या उचलत असून त्यांनी 2022 पर्यंतचे सर्वेक्षण पूर्ण करून आपला व्यवसाय येथे थाटला आहे. यासाठी कमी पैशात व योग्य आकारात कूलर तयार करणे तसेच नवनवीन योजना बाजारात आणण्याची या कंपन्यांची स्पर्धा सुरू आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका हा उष्ण कटिबंधातील देशांना मोठ्या प्रमाणात बसतो व याचा फायदा या कंपन्या घेत आहेत.  ज्यावेळी देशात कूलर व वातानुकूलित यंत्रणेची एवढी उपलब्धता नव्हती व आर्थिक सुबत्ता नव्हती. तेव्हा साथ दिली ती पंख्यांनी. आजही इलेक्ट्रिकवर चालणारे पंखे मोठ्या प्रमाणात खपत असले तरी पूर्वीच्या प्रमाणात त्यांची वाढ नाही. तरीही दरवर्षी 12.70 टक्के पंखे जास्त खपतात. कूलर व एअर कंडिशनर हे उन्हाळ्यात वापरले जात असले तरी पंखा हा बारा महिने गरजेचा आहे. पंखा तयार करणार्‍या कंपन्यांनीही आता नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरूवात केली आहे. आकर्षक व सुबक पंखे बाजारात आणले आहेत. पंखे हे प्रामुख्याने सिलिंग, वॉल, टेबल व पेडेस्टल प्रकारात मिळतात. यासाठी येथे उषा, क्रॉम्पटन अ‍ॅण्ड ग्रिव्हज, ओरिएंटल, हॅवेल, बजाज या कंपन्या काम करीत आहेत. असल्याने यास मागणी वाढत चालली आहे. जसजशी ग्रामीण भागात ही विजेची उपलब्धता वाढत चालली आहे तसतसे कूलर व वातानुकूलित यंत्राची विक्री तेथे वाढत आहे. यातच सर्वच कंपन्यांनी हप्त्यावर याची विक्री सुरू केल्याने आगामी काळात यास आणखी प्रतिसाद मिळेल असे व्यापारी सांगतात.  कूलर तयार करणार्‍या ज्या नामांकित कंपन्या आहे. त्यांचे उत्पादन जास्त प्रमाणात असून याचा कच्चा माल सहज उपलब्ध होत असल्याने यात व्यावसायिकांना नफ्याचे प्रमाणही जास्त आहे. यात वेगवेगळ्या स्किम दिल्या जात आहेत तर कूलर विक्रीचे प्रमाण वाढावे म्हणून स्पर्धाही घेतल्या जात आहेत. डिसेंबरपासून या कंपन्या बैठकांचा सपाटा लावतात व उन्हाळ्यात विक्री वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. कूलरच्या विक्रीत नफा जास्त असल्याने व्यावसायिकही या काळात अन्य वस्तूंपेक्षा याच्या विक्रीवरच जास्त भर देतात. सध्या बाजारात 2 हजार रूपयांपासून ते 15 हजारापर्यंतचे कूलर उपलब्ध आहेत. घरगुती बाजारात तयार होणारे विना ब्रँडचे कूलर हे अत्यंत स्वस्त दरात मिळत आहेत. इलेक्ट्रिकल वस्तू असल्याने ते घेताना पूर्ण खबरदारी बाळगावी लागते. यामुळेच पूर्वी जे पत्र्यापासून तयार होणारे कूलर होते याची मागणी कमी झाली व प्लॅस्टिकपासून तयार होणार्‍या कूलरकडे कल वाढला. सध्याचा उन्हाळा हा अत्यंक कडक असून दुपारी बारा ते चार हा काळ अत्यंत जिकरीचा मानला जातो तर दिवसभराच्या उन्हाच्या कडाक्याने सिमेंटच्या भिंती व स्लॅब तापून रात्री सारेच घामाघूम होताना दिसतात. यापूर्वी ग्रामीण भागात दगडी घरे होती पण आता सर्वत्र सिमेंट क्राँकिटच्या घरांची बांधणी होत आहे. कमी होत असलेली वनराई व पाण्याचे जमिनीतील मुरण्याचे अत्यल्प प्रमाण यामुळेही उष्णता वाढत चालली आहे. उन्हाळ्यात कोरड्या पडणार्‍या नद्या व तलावातील पाणी आटत आहे. अशा स्थितीत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय पर्याय राहिलेला नाही.  मुळात भारत देश हा उष्ण कटिबंधातील आहे. येथे भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने जगभरातील लोकांना याचे आकर्षण आहे, परंतु उन्हाळ्यात येथे सूर्यदेवाचा कोप अतिप्रचंड असल्याने या काळात पर्यटकांची रेलचेल कमी होते. मात्र याचवेळी जगभरातील कूलर व वातानुकूलित यंत्रणा करणार्‍या कंपन्यांची मात्र येथे धावपळ सुरू असते ती फायदा कमविण्यासाठी. एका सर्वेक्षणानुसार 2012 नंतर देशात एअर कूलरच्या विक्रीत प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. 2022 पर्यंतचे नियोजन कंपन्यांनी केले असून नवनवीन आकार व तंत्रज्ञान असणारे कूलर बाजारात आणले जात आहेत. डिसेंबरपासूनच या कंपन्या येथे तयारी करीत असतात. महाराष्ट्रात उन्हाळा हा मार्च ते मे महिना या दरम्यान असतो तर उत्तर भारतात तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो.  कंपन्यांनी येथील सर्वेक्षण करून कशा पध्दतीने कूलर येथे खपले जातात याचा अभ्यास केला आहे. सध्या लहान पण पॉवरफुल कूलरला मागणी असल्याचे त्यांनी हेरले आहे. यातच सुंदर आकारालाही महत्त्व आले आहे. कूलर बाजारात नामांकित कंपन्या उतरल्या असताना घरगुती बाजारात तयार होणारे कूलरही येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. सध्या घरोघरी कूलर असणे ही गरज बनली आहे.  शहरी भागाबरोबरच ग्रामीणमध्येही आता एअर कंडिशनर बसविले जात आहेत. वीज उत्पादन वाढत असल्याने आता ही समस्या कमी होत चालली आहे. एअर कंडिशनरचा विक्री दर प्रतिवर्षी दहा टक्क्यांनी वाढत चालला आहे. कमी किमती व वीज बचत करणार्‍या वातानुकूलित यंत्रणांचा भरणा वाढत चालल्याने शहरांमध्ये तर सर्रास याची खरेदी होत आहे. पाण्याची कमतरता अनेक भागात असल्याने कूलरपेक्षा ए.सी.ना मागणी वाढत आहे. पुढील चार वर्षांत एसी विक्रीचा दर आणखी वाढेल असा अंदाज असल्याने येथे नामांकित कंपन्या जगभरातून येत आहेत. सध्या बाजारात एल.जी., पॅनासॉनिक, हिताची, डायकेन, मित्सुबूशी, व्हर्लपूल, ब्ल्यू स्टार, हायर, लॉयड, व्होल्टाज या कंपन्याची चलती आहे.    

No comments:

Post a Comment