जत,( प्रतिनिधी)-
शेगाव (ता.जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका उज्ज्वला मच्छिंद्र नेटके ( वय 40) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. घराच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने आत्महत्येची ही घटना उजेडात आली. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. जत पोलिस ठाणे तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उज्वला नेटके यांचा विवाह 20 वर्षांपूर्वी जत येथील शिवाजी खंडागळे यांच्याबरोबर झाला होता. खंडागळे मजुरी करतात.
विवाहानंतरही उज्वला यांचे नाव कागदोपत्री नेटके असेच राहिले. उज्वला व शिवाजी यांना एक मुलगी आहे. उज्वला यांचे पतीसोबत पटत नसल्याने कौटुंबिक कलहातून गेल्या दोन वर्षांपासून त्या पतीपासून विभक्त होऊन येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. दोन वर्षांपासून त्यांचे पतीसोबतचे बोलणे बंद होते. पती शिवाजी उज्वला यांच्या आई रंजना मच्छिंद्र नेटके यांच्या घरी राहतात. उज्वला रात्रपाळीसाठी गेल्यास त्यांची मुलगी आजी व वडिलांकडे राहण्यास जात होती. शनिवारी व रविवारी उज्वला यांचा काहीच संपर्क न झाल्याने त्यांचा भाऊ सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घरी गेला. त्यावेळी त्याला दरवाजा आतून बंद दिसला. तसेच घरातून दुर्गंधी येत होती.
खिडकीतून पाहिल्यावर उज्वला यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तोपर्यत या घटनेची माहिती शेजार्यांनाही नव्हती. जत पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात केली. फिर्याद उज्वला यांची आई रंजना नेटके यांनी दिली आहे. आत्महत्या अज्ञात कारणांनी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल वीर तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment