Sunday, March 10, 2019

जिल्हा परिषद शिक्षकांची आता तीन वर्षे बदली नाही


जत,(प्रतिनिधी)-
शासनाने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात शुद्धिपत्रक काढत बदलीपात्र शिक्षकांच्या व्याख्येत बदल केला असून त्यानुसार सर्वसाधारण क्षेत्रात सलग 10 वर्षे मात्र सध्याच्या शाळेत तीन वर्षे सेवा झालेले शिक्षक यंदा बदलीस पात्र ठरणार आहेत. यामुळे मागील वर्षी मोठ्याप्रमाणात बदली झालेल्या शिक्षकांची आता पुढील तीन वर्षे बदली होणार नाही.

राज्य सरकारने मागील वर्षी जि. . शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी सुधारित धोरणाची अंमलबजावणी करत संगणकीय प्रणालीद्वारे बदल्या केल्या. या धोरणानुसार बदलीसाठी शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 तर अवघड क्षेत्रात 3 वर्षे सेवा असणे आवश्यक होते. मात्र सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांची एकदा बदली झाली की, जोपर्यंत ते अवघड क्षेत्रात जात नाहीत तोपर्यंत असे शिक्षक बदलीपात्र ठरतात, नव्या बदली धोरणानुसार त्यांची प्रत्येक वर्षी बदली होऊ शकते असा मुद्दा औरंगाबाद खंडपीठात शिक्षकांच्या बदल्याबाबत न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे त्या शिक्षकांची एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा बदली होण्यासाठी काही कालावधी निश्चित केला जाणार आहे काय? अशी न्यायालयाने शासनाच्या वकिलांना विचारणा केली होती. त्यावेळी शासनाच्यावतीने एकदा ऑनलाइन बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे त्यांची बदली केली जाणार नाही असे सांगितले होते.
त्यानुसार आता शासनाने शुद्धीपत्रक काढत बदली पात्र शिक्षकांच्या व्याख्येत बदल केला आहे. ज्या शिक्षकांची बदलीस निश्चित धरावयाची सेवा 10 वर्ष पूर्ण व सध्याच्या शाळेतील सेवा किमान तीन वर्ष पूर्ण झाली आहे असे शिक्षक बदली पात्र असणार आहेत. या वर्षी शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 25 मार्चपासून सुरू होत असल्याने बदलीपात्र, बदली अधिकार प्राप्त शिक्षक व निव्वळ रिक्त जागा यांच्या याद्या शुद्धी पत्रकानुसार 19 मार्च पर्यंत संबंधित जि. . नी घोषित कराव्यात असे सांगितले आहे. कोकण विभागातील बदल्या चालू (मार्च) महिन्यातच पूर्ण करण्यात आल्याने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वगळून उर्वरित सर्व जिल्ह्यात जि. . शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment