Monday, March 25, 2019

जत तालुक्याला पाणीपुरवठा करणारे टँकर गाठणार शंभरी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका हा वर्षनुवर्षे दुष्काळाशी सामना करत दिवस काढत असलेला हा तालुका आहे. या तालुक्यात दरवर्षी किमान शंभर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात सहा महिने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तालुक्यात सध्या 70 गावे व 455 वाड्या-वस्त्यांना सत्तर टँकरद्वारे एक लाख दहा हजार लोकांना प्रतिमाणसी वीस लिटरप्रमाणे पाण्याचा पुरवठा होत आहे. मार्चअखेर 100 पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने प्रशासनाची मात्र ऐन लोकसभा निवडणुकीत चांगलीच तारांबळ उडाली आहे.

जत तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने या गावात मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. मात्र जतच्या पूर्वभागातील 90 ते 95 गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने जमिनीखालील पाणी वेगाने कमी होत असून तालुक्यातील अनेक जलसाठे संपुष्टात येत आहेत. तालुक्यातील अनेक टक्के तलावात एक थेंबही पाणी नाही, केवळ अंकलगी (ता. जत) येथील साठवण तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा सुरू असला तरी अनेक गावात पाणी कमी पडत आहे. त्यामध्ये वजनवाढ, गुगवाड, बसर्गी, दरिकोणुर, दरीबडची, जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ, उमदी, सुसलाद, हळ्ळी या गावांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून लोकसंख्या मोठी असल्याने पाणी कमी पडत आहे. जत पंचायत समितीमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे टँकरच्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी जिल्हा परिषदेने तातडीने पाणी टंचाईसाठी या विभागात सर्व पदे भरून तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत द्यावा, अशी मागणी अनेक गावातील नागरिकांनी दै. ‘केसरीशी बोलताना सांगितले. गळक्या टँकरने पाणीपुरवठा जत तालुक्यात सध्या 70 टँकरने पाणीपुरवठा सुरू असला, तरी अनेक गावांत गळक्या व गंजक्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे आणि टँकरमधील पाणी गावापर्यंत जाईपर्यंत 50 टक्के पाणी रस्त्यावर सांगते. त्यामुळे येथील नागरिकांना 50 टक्केच पाणी पुरवठा केला जातो. तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिकांनी तक्रार करूनही शासनाने याची गंभीर दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांना गंजक्या टँकरमधून पाणी प्यावे लागत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांतील स्वच्छ आणि करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छ पाणी द्यावे लागत असल्याने याची दखल घेऊन स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment