Thursday, March 28, 2019

जत तालुक्यातून जाणारे दोन्ही रेल्वे मार्ग नामंजूर केल्याने तालुकावासीयांची निराशा


जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्याचा सर्वागीण विकास  करण्यासाठी २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज- जत- विजयपूर (१२२किमी) आणि पंढरपूर -उमदी-विजयपूर (१०८.२४किमी) हे दोन्हीही रेल्वे मार्ग सर्व्हेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते.त्यापैकी पंढरपूर -उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हे  पूर्ण होवून १२९४.६९ कोटी रूपये तरतूद करून  अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविले होते.या दोन्हीही रेल्वे मार्गाचा पाठपुरावा म्हणून सध्याच्या लोकप्रतिनिधीनी आॕगस्टला मंत्रालयाकडे विचारणा केली होती. त्यामुळे  या दोन्हीही रेल्वे मार्गाला गति मिळाली होती, पण रेल्वे बोर्डाने ऑगस्ट आणि नोव्हेंबर २०१८ ला या दोन्हीही रेल्वे मार्ग  नामंजूर केल्याने तालुकावासीयांची घोर निराशा झाली आहे.

दुसरीकडे गेल्या पाच वर्षातजत तालुक्यात कराड-तासगाव-जत (एन एच २६६),गुहाघर-विजापूर (एन एच १६६ ई),इंदापूर-जत (एन एच ९६५ जी),पंढरपूर -उमदी-विजापूर (एन एच ५१६अ) या राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू असुन गोकाक- अथणी- जत या राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अहवाल (DPR) बनवायचे काम हे कर्नाटकातील विजयपूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात सुरू असुन त्याचे काम लवकर सुरू होणार आहे. पण जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे सर्वागीण विकासाठी राष्ट्रीय महामार्गाबरोबर  जत आणि उमदी वरून जाणारे रेल्वे होणे गरजेचे होते या काळात ते नामंजूर करण्यात आले .त्यामुळे जत तालुका पुन्हा विकासापासून वंचित राहणार आहे.
जत तालुक्यातून रेल्वे मार्ग गेला नसल्याने डाळींब, द्राक्षे, बोर या शेतमाला बरोबरच अन्य गोष्टी अन्य शहरात पाठवताना शेतकरी आणि व्यापारी लोकांना त्रासदायक आणि खर्चिक ठरत आहे. शिवाय कच्चा माल या भागात येण्यासाठी कुठलीच दळणवळण व्यवस्था नसल्याने उद्योजक या ठिकाणी उद्योग धंदे उभे करायला तयार नाहीत.साहजिकच या भागातील लोकांना काम मिळत नाही. त्यामुळे या भागातील लोक स्थलांतर करत आहे. मोठ्या प्रमाणात लोक ऊसतोडी,वीट भट्टी, दगड खोदकाम यासह छोट्या मोठ्या कामांसाठी शहारासह अन्यत्र स्थलांतर करीत आहेत. जत तालुक्याचा विकास साधण्यासाठी तालुक्यातून रेल्वे मार्ग जाणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment