Friday, March 8, 2019

शिक्षकांच्या एमएससी-आयटी संदर्भातील वसुलीस स्थगिती

जत,(प्रतिनिधी)-
 मंत्रालयापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत प्रयत्न करून एम.एस.सी.आय.टी. वसुली स्थगितीस शिक्षक संघटनांनी अखेर यश मिळवले असून सांगली जिल्हा परिषदने याबाबत नुकताच आदेश काढला, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व सरचिटणीस कृष्णा पोळ,शिक्षक समितीचे दयानंद मोरे यांनी दिली.
याचा जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षकांना लाभ होणार असून लाखो रूपयांची वसुली थांबणार आहे. याबाबत संघटनेच्या विनंतीची तात्काळ दखल घेत संबंधित आदेश काढलेबद्दल संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांचा सत्कार करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या एम.एस.सी.आय. टी. वसुलीस शासनाने पुढील धोरणात्मक निर्णय होईपर्यंत स्थगिती दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे शिक्षक संघ, शिक्षक भारतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. श्री घुले यांनी एम.एस.सी.आय.टी. वसुलीस स्थगितीचे पत्र काढून सर्व विभागप्रमुखांना कळवले आहे. शिक्षक संघाच्यावतीने या निर्णयाबद्दल सीईओ श्री. राऊत, शिक्षण विभागाचे अधिकारी व सामान्य प्रशासनाच्या अधिकार्यांचे आभार मानल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. याबद्दल शिक्षक भारती कडूनही सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले. महेशकुमार चौगुले, बालम मुल्ला, कादर अत्तार, दिलीप भोसले, चंद्रकांत क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment