Thursday, March 7, 2019

जिल्ह्यासाठी आणखी 47 कोटी दुष्काळनिधी


सांगली,(प्रतिनिधी)-
 दुष्काळातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचा दुष्काळी निधीचा 47 कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनास नुकताच प्राप्त झाला. आतापर्यंत 115 कोटींचा निधी दुष्काळासाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून 85 टक्के रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आले आहेत. हा निधी तातडीने शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना बँकांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, दुष्काळी स्थितीत राबवायच्या आठही उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन दक्ष असून या सर्व उपाययोजना सक्षमपणे राबवाव्यात; अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डॉ. चौधरी यांनी दिला आहे. जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडील आदी दुष्काळाने बाधित झालेल्या शेतकर्यांना मदत करण्यासाठी शासनाने फळबागांसाठी हेक्टरी 18 हजारांची, तर खरीप पिकांसाठी हेक्टरी सात हजाराशी मदत जाहीर केली आहे. या निधीसाठी पहिल्या टप्यात जिल्ह्याला सुमारे 68 कोटी रुपयांचा निधी आला होता. दुसर्या हप्तापोटी 47 कोटी रुपये आले आहेत. असा एकूण 115 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी जत ताालुक्यासाठी 41 कोटी निधी दिला असून 25 कोटी म्हणजे 60 टक्के निधी वाटप करण्यात आला आहे. कवठेमहांकाळसाठी 13 कोटी, खानापूरसाठी 24 कोटी, आटपाडीसाठी 6.52 कोटी तर तासगावसाठी 30 कोटी रूपयांचा निधी आला आहे. यापैकी 99 टक्क्यांपर्यंतचा निधी बँकांकडे वर्ग केला आहे. बँकांमार्फत हा निधी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सर्वच बँकांना हा निधी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने सादर केलेला ऑक्टोबर 2018 ते जून 2019 अखेरच्या दुष्काळी उपायजोजनांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. सध्या जिल्ह्यात 95 गावे व 674 वाडीवस्त्यांना 93 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने जून 19 अखेरचा आराखडा मंजूर केला असून 19.15 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी सर्वाधिक निधी हा टँकरसाठीच खर्च होणार आहे. जून 19 अखेर जिल्ह्यात 496 गावे आणि 2605 वाडी-वस्त्यांना 496 टँकरने पाणी पुरवावे लागणार आहे. या शिवाय विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी घेणे या उपायजोजना हाती घेतल्या आहेत. चारा छावणीसाठी जत, कवठेमहांकाळ व आटपाडी तालुक्यांतून 7 प्रस्ताव आले होते. हे प्रस्ताव छाननीसाठी पुरवठा कार्यालयाकडे पाठवले असून छाननीनंतर या छावण्या सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. डॉ. अभिजित चौधरी; 115 कोटींचा निधी शेतकर्यांना द्या ; दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करा; अन्यथा कारवाई कर्जाची सक्तीने वसुली झाल्यास तक्रार करा काही दुष्काळी गावांमध्ये शेतकर्यांच्या कर्जाची; तसेच इतर शासकीय देण्यांची वसुली सक्तीने केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले असता आठ दुष्काळी उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सक्तीने वसुली होत असल्यास तक्रार करावी संबंधितांवर कारवाई करू. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एस.टी. चे पास मोफत देण्यात येत आहेत, मोफत मिळत नसतील तर संबंधितांनी सोमवार व शुक्रवारी आपल्याकडे थेट तक्रार करावी.

No comments:

Post a Comment