जत,(प्रतिनिधी)-
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला
जातो. तरुण पिढीवरच या देशाचे भवितव्य अवलंबून असून यंदाच्या
लोकसभा निवडणुकीत तरुणाई कुणाला कौल देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रामुख्याने सांगली लोकसभा मतदारसंघात तरुणाई कोणत्या उमेदवाराला व पक्षाला
पसंती देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
यंदा भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात जनजागृती केली आहे. त्यातच कालपर्यंत म्हणजे 30 मार्च 2019 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने मतदारयादीत नावनोंदणी करण्याची संधी युवावर्गाला देण्यात आली होती. त्यामुळे यंदा निश्चितच मतदारांची संख्या वाढणार आहे. नवमतदार कोणत्या पक्षाला व कोणत्या उमेदवाराला संधी देणार यावरूनच पुढील चित्र स्पष्ट होणार हे मात्र निश्चित आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा
मोठ्या प्रमाणात पाठिंबा भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाल्याने ते सत्तेवर
बसले. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी होता.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत देशात बेरोजगारीची समस्या कायम असली
तरीदेखील जागतिकीकरणामुळे ऑनलाइन पद्धतीने जे काही बदल झाले आहेत, ते मोठ्या धाडसाने तरुण पिढीने स्वीकारले आहेत. त्यामुळेच
आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र ऑनलाइन व्यवहार सुरू झाला आहे. राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान म्हणून केलेल्या कामाची मोदींची छाप कायम आहे.
तरीही बेरोजगारीची समस्या काही मिटली नाही, त्यातच
शेतकर्यांचे झालेले हाल तरुण पिढी आजही पाहात आहे. त्यामुळे यंदा पुन्हा मोदींना पसंती देणार का? हे पाहणे
महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच काँग्रेसकडून राहुल गांधी व प्रियंका
गांधी यांचे नेतृत्व समोर आले आहे.
राहुल आणि
प्रियंका गांधी हे दोघेही तरुणाईमध्ये मिसळून सर्वत्र जाऊन आपली प्रचार यंत्रणा राबवित
आहेत. गरिबांना मदत हा मंत्र स्वीकारून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे, त्याचा पक्षाला कितपत फायदा होणार हे महत्त्वाचे आहे. त्यातच तरुण पिढी या दोघांना संधी देऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारणार का हेही
पाहणे आवश्यक आहे. देशपातळीवर मोदी आणि गांधी या नेतृत्वाचे राजकारण
गृहीत धरून जिल्ह्यात तरुण पिढी कोणाला संधी देणार हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाई आपली मते स्पष्टपणे व्यक्त करताना
दिसून येत आहे. सध्यातरी तरुणांमध्ये मोदींचाच बोलबाला अधिक दिसून
येत आहे.
No comments:
Post a Comment