Friday, March 8, 2019

जत येथे माता आदीशक्ती सेवाभावी संस्थेच्यावतीने महिला दिन साजरा


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील शिवाजी पेठेतील हराळे समाज विठ्ठल मंदिरात माता आदीशक्ती सेवाभावी संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रारंभी माता आदीशक्ती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ.रंजना कणसे यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना सौ.कणसे म्हणाल्या की, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड जशी महत्त्वाची आहे,तशी समाजात संतुलन राखण्यासाठी स्त्री-पुरुषांचे प्रमाणदेखील समान असायला हवे. अन्यथा समाजात अराजकता माजेल. स्त्रीभ्रूण हत्या टाळून कुटुंबांनी समाजात संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आरोग्य अधिकारी डॉ.हेमा कांबळे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत सांगताना महिलांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणून घ्यावे. आरोग्य संपन्न महिला संपूर्ण कुटुंब आरोग्यदायी बनवू शकते. महिलांनी घर,परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सुदृढ आरोग्यासाठी हातभार लावावा. यावेळी महिलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अनिता संकपाळ, नगरसेविका जयश्री शिंदे, माया आदाटे, लता संकपाळ, छाया संकपाळ, विजया भंडारे, वर्षा संकपाळ, मनीषा साळे, कल्पना संकपाळ, गोकुळा खाडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment