Wednesday, March 13, 2019

राज्यात गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी जलसाठा


जत,(प्रतिनिधी)-
उन्हाळा हंगाम सुरू झाला असून राज्यातील सर्व लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 32.18 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी आहे. अनेक तलाव आणि मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे तर बहुतांश तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.

राज्यात 2018 च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळी वातावरण आहे. राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण 3267 प्रकल्प असून याची क्षमता 40 हजार 897 दशलक्ष घनमीटर पाणी साठवणुकीची आहे. यात सध्या उपयुक्त पातळीत 13 हजार 160 दलघमी पाणी साठा आहे. लघू प्रकल्पांमध्ये केवळ 23 टक्के पाणी आहे तर मध्यम योजनांमध्ये 35 टक्के जलसाठा आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 33.61 टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला या मोठ्या योजनांमध्ये 50 टक्के पाणी होते.
उन्हाळ्याची तीव्रता आता वाढू लागली असून जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवनही यामुळे वेगाने होत आहे. सध्या दिवसाला पाच मिलीमीटरहून अधिक पाणी या उन्हामुळे कमी होत आहे. 2012 2015 च्या भीषण दुष्काळात पन्नास टक्क्याहून अधिक मृतसाठ्यातील पाणी वापरण्याची वेळ आली होती. दुष्काळी तालुक्यांमध्ये केवळ 38 टक्के पाऊस झाल्याने सध्याच ग्रामीण भागात जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. विहिरी व विंधन विहिरींचे पाणी आटण्याच्या बेतात आहे. आगामी तीन महिने ही पाणीटंचाई असणार आहे. या काळात चारा पिके, ऊस व फळबागांना पाण्याची गरज भासत आहे.

No comments:

Post a Comment