Sunday, March 17, 2019

येळवीत युथ फेस्टिवलचे आयोजन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळवी येथील सावली फौंडेशनच्यावतीने येळवी युथ फेस्टिवल 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये 27 मार्चला युथ टॅलेंट सर्च परीक्षा तर 31 मार्चला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात येळवी मॅरेथॉन यशवंतांची गौरवगाथा, मान्यवरांचे मार्गदर्शन, बक्षीस वितरण आणि माँ तुझे सलाम या सांस्कृतिक अशा कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आल्याची माहिती सावली फौंडॅशनचे अध्यक्ष सुनील साळे आणि सचिव प्रकाश गुदळे यांनी दिली.
31 मार्च रोजी सायंकाळी पाच ते नऊ वाजण्याच्या दरम्यान होणार्या मुख्य कार्यक्रमात सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, आयएएस अधिकारी गणेश टेंगले, परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर, आयटीआय क्षेत्रातील ओंकार गडदे, सौरभ गडदे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गृहविभागाचे उपसचिव वीरसिंह पाटील, इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रमोद गंगनमाले, समाजकल्याण अधिकारी सचिन कवले, महामंडळाचे सहाय्यक सचिव शिवाजी खांडेकर, बीडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे, सचिन सुरवसे, गणपत पवार, मच्छिंद्र ऐनापुरे, वसंतराव सांगोलकर, गुरुबसव पाटील, रामचंद्र शिंदे, एस.एल.पाटील, मंदार मोकाशे आदी उपस्थित राहणार आहेत. या युथ फेस्टिवलचा जतकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.समाधान जगताप, महेश मालगत्ते, अजित घोंगडे, रवी जिपटे आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment