जत,(प्रतिनिधी)-
सांगली
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने प्रशासकीय विभागाने जय्यत तयारी चालू केली
आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना निवडणूक
प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यांमध्ये गुंतवल्यामुळे सरकारी कार्यालये
ओस पडल्याचे दिसून येत आहेत. निवडणूक कामाची यंदा अधिक प्रमाणात
भर पडल्याने शासकीय कर्मचारीही गोंधळलेले दिसत आहेत. साहजिकच
निवडणूक कामे झाल्याखेरील लोकांची कामे होणार नाहीत, असाच सूर
निघत आहे.
तालुक्यात भाजपच्यावतीने बैठका घेण्यात आल्या. इथे दोन गट दिसून आले तरी पक्षाची
प्रचारयंत्रणा गतिमान झाली आहे. काँग्रेसकडून
अद्याप उमेदवार दिला गेला नसल्याने या गोटात शांतता असली तरी नेते,कार्यकर्ते आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. ही जागा स्वाभिमानीला
सोडण्यात आल्याने नेमके काय घडणार,याची उत्सुकता लागली आहे. तर दुसर्या
बाजूला बहुतांशी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामाला जुंपले गेले
असल्याने शासकीय कार्यालये ओस पडली आहेत आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी
हेलपाटे मारून दमत आहेत. अगदी किरकोळ कामांसाठी सुद्धा निवडणुकीच्या
कामाचा बागुलबुवा दाखवून सर्वसामान्य नागरिकांना परत पिटाळले जात असल्याची नागरिकांची
तक्रार आहे.
कोणतीही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की, शासकीय यंत्रणा दिवसरात्र कार्यरत झाल्याचे दिसून येते. निवडणूक कामात कोणतीही हयगय झाल्यास अधिकारी अथवा कर्मचारी याला परिणामास सामोरे
जावे लागते. निवडणुकीची कामे अत्यंत क्लिष्ट असल्याने फार मोठे
मनुष्यबळ यासाठी लागते. त्यामुळे बहुतांशी शासकीय कार्यालयातील
अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठ्या संख्येने निवडणूक कामासाठी
नियुक्ती केली जाते. याशिवाय शासकीय कार्यालयांची वाहने देखील
निवडणूक कामासाठी ताब्यात घेतली जातात. त्यामुळे या कालावधीत
शासकीय कार्यालयांमधील अनेक कामे खोळंबतात व नागरिकांची गैरसोय होते. निवडणूक कामाचा बागुलबुवा दाखवून पंचायत समिती, आरोग्य,
महसूल खात्यांमध्ये सध्या नागरिकांना किरकोळ कामांसाठी हेलपाटे मारणे
भाग पाडले जात आहे. निवडणूक कामासाठी नियुक्ती न झालेले अधिकारी
आणि कर्मचारी व शिपाई देखील निवडणूक काम आहे, असे सांगून कार्यालयातून
गायब होत असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या मात्र किरकोळ कामांसाठी आलेल्या नागरिकांना
सर्वसामान्य कर्मचार्यांची गयावया करावी लागत असल्याचे
दिसत आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती नसताना देखील काही
कर्मचारी निवडणूक काम आणि आचारसंहिता अशी कारणे सांगून नागरिकांना हेलपाटे मारण्यास
भाग पाडत आहेत. निवडणुकीसंदर्भात कोणतेही जबाबदारीचे काम नसताना
अनेक अधिकारी व कर्मचारी अनेक दिवसांपासून कार्यालयात गैरहजर असल्याची नागरिकांची तक्रार
आहे. विशेष म्हणजे राजकीय नेते व संबंधित नागरिकांची मात्र कोणतीही
कामे निवडणुकीच्या कारणास्तव खोळंबलेली दिसत नाहीत. त्यांची हुजरेगिरी
करणारे करणारे अधिकारी व कर्मचारी या लोकांची कामे बिनबोभाट करून देत आहेत,
अशीही नागरिकांची तक्रार आहे. प्रशासनातील वरिष्ठ
अधिकार्यांनी याबाबत लक्ष घालून नागरिकांची गैरसोय टाळावी,
अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments:
Post a Comment