Monday, March 25, 2019

सोशल मीडियावर तापू लागले राजकीय वातावरण


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच ठिकाणी राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे.चौकातील किंवा पारावरच्या गप्पांची जागा आता सोशल मीडियाने घेतलेली आहे. सोशल मीडियाची व्यापकता आणि उपयुक्तता पाहता सर्वांनीच राजकीय चर्चेसाठी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळविलेला आहे. राजकीय पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत तसतसे राजकीय चर्चांनी सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापत आहे.

  पूर्वी निवडणुका जाहीर झाल्या की पारावरच्या गप्पा किंवा चौकातील चर्चा जोर धरत असत. रात्रीच्या वेळी ही ठिकाणे गर्दीने फुलत. यावेळी कोणत्या पक्षाला फायदा होणार? कोणाला उमेदवारी द्यावी? कोणाला बाजूला करावे? अशा चर्चेने पहाट उजाडत असे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे.त्यामुळे सर्वच संदर्भ बदलेले आहेत.सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर ही राजकीय चर्चेची मुख्य ठिकाणे बनली आहेत. सोशल मीडियामध्ये ग्रुप तयार करून विविध माहिती, फोटो, आणि व्हिडिओ प्रसारित करणे फारच सोपे झालेले आहे. जगाच्या कानाकोपर्यातील, विविध वयोगटातील तसेच विविध क्षेत्रातील लोकांना या ग्रुपमध्ये घेता येत असल्यामुळे सर्वच विषयावरील चर्चेची व्याप्ती सोशल मीडियावर वाढत असते. आणि याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही.
मागील लोकसभा निवडणुकीवेळी सोशल मीडियाचा फारच बोलबाला झाला.यामुळे सर्वच राजकीय पक्षांना, सत्ता काबीज करण्यासाठी सोशल मीडिया हे एक उपयुक्त माध्यम आहे हे लक्षात आले. सोशल मीडियावर होणार्या चर्चेची दखल घेण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडिया सेल तयार केले आहेत. आपआपल्या पक्षाची प्रतिमा उंचावणे, पक्षावर किंवा पक्षातील नेत्यांवर होणारी टीका खोडून काढणे, विरोधकांवर प्रहार करणे अशा कामगिरी या मीडिया सेलकडून होत असतात. सोशल मीडियावर असलेल्या सुविधांमुळे आजकाल प्रत्येकजणस्वयंघोषीतलेखक झाला आहे. नोटाबंदी,जीएसटी, राफेल, महागाई,इंधनदर, बँक घोटाळे, दहशतवाद आदी मुद्द्यांवर तो सहज मत व्यक्त करताना दिसत आहे. काय लिहावे? आणि काय लिहू नये? याचे बंधन नसल्यामुळे तसेच लिहिलेल्या मजकुराचे संपादनही होत नसल्यामुळे चांगल्याबरोबर वाईट विचारही सोशल मीडियावर फिरत आहेत.
 काहीजण, कोणते मुद्दे सरकारला फायदेशीर ठरणार हे पटवून देत आहेत तर काहीजण विरोधकांनी कोणत्या मुद्द्याचे भांडवल करावे हे ठासून सांगत आहेत. पण काही वेळा वैचारिक चर्चेपेक्षा राजकीय वादविवादच जास्त प्रमाणात होताना दिसत आहेत. या चर्चेवेळी प्रत्येक ग्रुपमध्ये दोन गट पडलेले दिसून येतात आणि मग याचे पर्यवसान वादात होते . नको ते मुद्दे रेटले जात आहेत. मुद्देसूद मत मांडणे किंवा प्रतिवाद करणे या ऐवजी खालच्या पातळीवर जाऊन निंदानालस्ती करण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. राजकारणात अनेक पावसाळेउन्हाळे खाल्लेल्या राजकीय व्यक्तींची किंवा मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या राजकीय व्यक्तींची सोशल मीडियावर टर उडविताना दिसत आहे. काही वेळा हा मीडिया अविवेकी बनलाय का? अशीही शंका येते. या सर्व वादावर पडदा टाकताना ग्रुप एडमिनना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 राजकीय गप्पा त्रयस्थपणे पाहणार्या अन्य सदस्यांना मात्र या वातावरणाचा चांगलाच त्रास होतोय. पण याला इलाज नाही. आधुनिक तंत्रज्ञानात काहीवेळा चांगल्याबरोबर वाईट गोष्टींचाही स्वीकार करावाच लागतो. असो, सध्या जमाना सोशल मीडियाचा आहे. पारावरच्या आणि चौकातील गप्पांचे ठिकाण बदलले असून राजकीय विषयांसाठी सोशल मीडियावरील चर्चेत सहभागी होण्याशिवाय सर्वसामान्यांसमोर सध्या तरी पर्याय नाही.

No comments:

Post a Comment