Friday, March 8, 2019

सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश: वनिता देसाई


जत,(प्रतिनिधी)-
महिलांनी घाबरायचं नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करीत राहिल्यास यश नक्कीच पदरात पडतं, असे प्रतिपादन सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका वनिता देसाई यांनी जत येथे बोलताना केले. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आरोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक वसंत बोराडे होते.

जागतिक महिला दिन जत येथील मनुश्री महिला बहुउद्देशीय विकास मंडळाच्यावतीने विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वनिता देसाई यांचा संस्थेच्यावतीने कर्तृत्ववान स्त्री म्हणून गौरव करण्यात आला. या यावेळी बोलताना सौ. देसाई म्हणाल्या की, स्त्रियांनी आता चूल आणि मूल ही पारंपारिक चौकट मोडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. महिलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. संघर्ष केला पाहिजे,कष्ट उपसले पाहिजे, त्याशिवाय यश पदरात पडत नाही. योग्य दृष्टीकोन ठेवून पुढे सरकल्यास स्त्री कधीच मागे राहणार नाही, असे शेवटी त्या म्हणाल्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक नयना सोनवणे यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. गरीब, होतकरू महिलांना मदत आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत असल्याचे सांगितले. यावेळी आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना संसरोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव,रामराव विद्यामंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक राजू कोळी, नंदकुमार सूर्यवंशी, भास्कर सोनवणे,दिनराज वाघमारे, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावना कोळी, संस्थेच्या संस्थापक सचिव सौ. नयना सोनवणे, उपाध्यक्षा सौ.नम्रता सूर्यवंशी, श्रीमती राजश्री शिंदे, सौ. विमल जाधव,सौ.प्रमिला साळुंखे, सौ.नीलम  थोरात, वर्षा सावंत, विनोदिनी सावंत आदी उपस्थित होते. शेवटी आभार विमल जाधव यांनी मानले.




1 comment: