Wednesday, March 6, 2019

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून जिल्ह्याला 11 कोटी 10 लाख


29 हजार 504 महिलांना मिळाला लाभ; जिल्हा राज्यात दुसरा
सांगली,(प्रतिनिधी)-
 प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सांगली जिल्ह्याने आघाडी घेतली असून जिल्ह्यातील 29 हजार 500 मातांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्याने या कामात राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर मनपा क्षेत्रात लाभ देण्यामध्ये राज्यात पहीला क्रमांक मिळवला आहे.
या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 11 कोटी 10 लाख 55 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाने कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत संबंधित महिलेस 5 हजारांची मदत देण्याची योजना जाहीर केली आहे. ही मदत संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट वर्ग केली जाते. तीन टप्प्यात ही मदत देण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक वर्षी साधारण 40 हजार नवबालकांचा जन्म होतो. यावर्षी जिल्ह्यास 39 हजार 208 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 29 हजार 504 महिलांना लाभ देण्यात आला. हे प्रमाण 75.25 टक्के इतके आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणात शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांचे आत नोंदणी करणे, शासकीय संस्थेत गरोदर काळादरम्यान तपासणी करणे, बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण या गोष्टींची आवश्यकता आहे. जिल्हा समन्वयकांचा सत्कार मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागासह मनपा व जिल्ह्यातील नगरपालिका आरोग्य विभागाने यासाठी चांगली मदत केली. त्यामुळे जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळवले. या बद्दल जिल्हा कार्यक्रम समन्वयक महेश नंदीवाले यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षण समिती सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती डॉ. नायकवडी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीगोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. विवेक पाटील, डॉ. पोरे, अश्विनी पाटील, अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.
तालुका लाभ दिला दिलेली रक्कम आटपाडी (1549) 6185000, जत (3830) 14292000, कडेगाव (2383) 9524000, कवठेमहांकाळ (1747) 6796000, खानापूर (1381) 5343000, मिरज (4445) 16931000, पलूस (1751) 6246000, शिराळा (1858) 7068000, तासगाव (2691) 10830000, वाळवा (3956) 15718000, विटा (107) 291000, तासगाव (115) 413000, आष्टा (138) 457000, इस्लामपूर (269) 901000, सांमिकु मनपा (4384) 10060000

No comments:

Post a Comment