Monday, March 25, 2019

टँकरने 41 गावांना पाणीपुरवठा करणारा अंकलगी तलाव गाठतोय तळ


जत,(प्रतिनिधी)-
जत पूर्व भागातील 41 गावांना पाणीपुरवठा करणार्या अंकलगी साठवण तलावात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असून झपाट्याने तलावाने तळ गाठण्यास सुरवात केली आहे. भविष्यात जत पूर्वभागात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जत पूर्वभागातील अंकलगी साठवण तलावातून मागील चार महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जत तालुक्यातील 68 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या टँकरपैकी 41 टँकर हे पाणी भरण्यासाठी अंकलगी तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज होणार्या लाखो लिटर पाणी उपशामुळे सध्या एक महिना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असून हा अंकलगी तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली जात आहे. जत पूर्व भागात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई जाणवणार आहे. अंकलगी तलावात पाणी भरून देण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी भरून दिले जात असून लाईट नसेल तर इंजिन व जनरेटरद्वारे पाणी भरले जात आहे. पण दररोज होणारा लाखो लिटर पाणी उपसा यामुळे पाणीपातळी दररोज खालावत चालली आहे.
 दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या पूर्वीचे विजापूर व आताचे विजयपूर जिल्ह्यात टँकर भरता यावेत, यासाठी जत प्रशासनाने सांगली जिल्हाधिकार्याांकडे प्रस्ताव पाठविला आहे. जत पूर्वभागात तेथून टँकर भरणे सोयीचे होईल, हा या मागचा प्रशासनाचा हेतू आहे. याबाबत सांगलीचे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, यावर सारे अवलंबून आहे. चिक्कलगीतून पाणी भरण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी उपसभापती अॅड आडव्याप्पा घेरडे अंकलगी यांनी केली आहे. तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला असून भविष्याचे नियोजन करण्यासाठी तुकाराम महाराज यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात चिक्कलगी येथे पंढरपूर येथून आलेल्या पाणी योजनेचे पाणी आलेले असून त्यांचे नियोजन झाले तर पाणी टंचाईत चांगली उपाययोजना होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले तर पुढील गैरसोय टळेल.
अंकलगी तलावातून 40 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यंदा अंकलगी तलाव जत पूर्वभागासाठी वरदान ठरला आहे. मागील चार महिन्यांपासून हा तलाव जत पूर्व भागातील दुष्काळग्रस्तांची तहान भागवत आहे. अंकलगी तलावातून संख, उमदी, माडग्याळ, कोंतेवबोबलाद, जाडरबोबलाद, गुड्डापूर, दरीबडची, दरीबडची लमाणतांडा, उटगी, तिल्याळ, सोन्याळ, तिकोंडी, आसंगी जत, करेवाडी, सोनलगी, दरीकोणूर, पांढरेवाडी, बेळोडगी, खंडनाळ, बालगाव, गिरगाव, जालिहाळ बुद्रुक, सोर्डी, लकडेवाडी, भिवर्गी, लवंगा, सिद्धनाथ, माणिकनाळ, कागणरी, मोरबगी, हळ्ळी, बोर्गी बुद्रुक, धुळकरवाडी व जालिहाळ खुर्दसह 40 गावांना पाणी पुरवठा सुरू आहे.

No comments:

Post a Comment