Thursday, March 7, 2019

जिल्हा परिषदेतील स्वीय निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहणार


सांगली,(प्रतिनिधी)-
 वर्षभर वेळेत खर्च करण्याचा तगादा लावूनही जिल्हा परिषद स्वीय निधीचा खर्च अद्यापही बराच मागे आहे. 31 जानेवारीअखेर केवळ 28 टक्केपर्यंतच झाला होता. सध्या मात्र सर्वच विभागाने विविध योजनांना घाईगडबडीने मंजुरी दिली असून त्यासाठी अधिकार्यांकडे पदाधिकारी आणि ठेकेदारांचा रेटा असल्याचे दिसत आहे. कितीही ओढाताण केली तरी अपवाद वगळता बहुतांश विभागांचा खर्च अखर्चित राहणार आहे.
अंतिम क्षणी धावपळ करूनही स्वीय निधी 20 टक्के निधी अखर्चीत राहाणार आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभागाने खर्चात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. मार्च 2018 अखेर मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला होता. त्यामुळे 2018-19 चा निधी वेळेत 100 टक्के खर्च व्हावा, असे नियोजन पहिल्या महिन्यापासून करण्याचे ठरले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी एप्रिल, मे महिन्यापासूनच स्वीय निधी वेळेत खर्च करण्यासाठी खातेप्रमुखाकडे तगादा लावला होता. वारंवार आढावा बैठका घेऊन काही खातेप्रमुखांना समजही देण्यात आली होती. तरीही स्वीय निधी दि. 31 जानेवारी 2019 अखेर केवळ सरासरी 28 टक्केच खर्च झाला होता. यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा 71.67 टक्केपर्यंत निधी खर्च झाला होता. या विभागाच्या अधिकार्यांनी मार्च महिनात जवळपास शंभर टक्केपर्यंत निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिक्षण, बांधकाम, छोटे पाटबंधारे विभागाचा 40 ते 41 टक्केपर्यंत निधी खर्च झाला होता. उर्वरित निधी आचारसंहितेपूर्वी खर्च करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांचे प्रयत्न चालू आहेत. काही ठेकेदारही पदाधिकार्यांमार्फत आचारसंहितेपूर्वी कामाच्या फायली मंजूर करुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेत तळ ठोकून आहेत. कृषी विभागाचा 31 जानेवारी अखेरीस 8.77 टक्के निधी खर्च होता. फेब्रुवारी महिन्यात या विभागाच्या अधिकार्यांनी लाभार्थी निवडीला गती दिल्यामुळे 90 टक्केपर्यंत निधी खर्च झाला असून उर्वरित 10 टक्के निधी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाचा 31 जानेवारीअखेरीस 10 ते 20 टक्केपर्यंत खर्च झाला होता. या विभागानेही व्यक्तीगत लाभाच्या योजनांना मंजूरी देत खर्चाचा टक्के 70 टक्केपर्यंत पोहोचविला आहे. या विभागाला आचारसंहितेपूर्वी शंभर टक्के निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान आहे.पदाधिकार्यांनी प्रयत्न करुनही निधी अखर्चीत राहात असल्यामुळे खातेप्रमुखांच्या कारभारावर जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या आठवड्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता घोषीत होणार असल्यामुळे बुधवारी जिल्हा परिषदेत निधी खर्च करण्यासाठी अधिकारी, पदाधिकार्यांची धावपळ चालू होती.

No comments:

Post a Comment