प्रकाशन सोहळ्यात इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांचे उद्गार
जत,(प्रतिनिधी)-
शेगाव (ता. जत) येथील कवी, लेखक महादेव बी. बुरुटे यांच्या बहुचर्चित आणि निसर्गप्रेमी काव्यरसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'ऋतुरंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पुणे जिल्ह्य़ातील सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात व्यंकोजीराजांचे तेरावे वंशज तंजावर येथील युवराज संभाजीराजे भोसले आणि इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांच्या हस्ते झाले.
निसर्गाचे विलोभनीय सदाबहार सौंदर्य आणि मानवी जीवन यांची सलग पूर्ण वर्षाची काव्यमय गुंफण असलेले हे पुस्तक निसर्ग संशोधकांना संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच उपयोगी पडेल असे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय मराठी साहित्य परिषद आयोजित दहावे राज्यस्तरीय छ. संभाजी महाराज साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी या संग्रहातील एकाच बंधात असलेल्या बावन्न आठवड्यातील बावन्न व एक शिर्षक कविता अशा एकूण त्रेपन्न कवितांमधून गुंफलेला जिवा-शिवाचा स्नेहबंध डॉ. शैलजा बुरुटे यांनी काही कवितांच्या वाचनातून उलगडला.
उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या संमेलनात सासवड नगर पालिकेचे उपाध्यक्ष संजय जगताप, अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे शरद गोरे, दशरथ यादव, राजकुमार काळभोर, राजाभाऊ जगताप, सुनिल लोणकर, शामकुमार मेमाणे, सुनिल धिवार, दत्ता भोंगळे, नंदकुमार दिवसे, गंगाराम जाधव, माजी आरोग्य सहाय्यक संचालक डॉ. पांडुरंग बुरुटे इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण शेतकरी कुटुंबातील श्री. बुरुटे हे लहानपणापासून दोन्ही पायांनी पूर्णतः अपंग असून त्यांचे आकाशवाणी तसेच विविध माध्यमातून कथा, कविता, लेख, आत्मलेख, परिचय, पुस्तक परीक्षणे इत्यादी प्रकारचे भरपूर लेखन आणि रानपालवी, ऋतुरंग हे काव्यसंग्रह तसेच साधुची युक्ती आणि इतर बालकथा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांची अन्य पाच पुस्तके लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहेत.
No comments:
Post a Comment