Tuesday, March 19, 2019

पाण्याचे एक भांडे ठेवू अन् दुर्मीळ होणारी चिमणी वाचवू

(जागतिक चिमणी दिवस)
जत,(प्रतिनिधी)-
सध्या दुष्काळ आणि पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. अनेक निरागस निष्पाप पक्ष्यांना यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, तर काहींचा पाण्याअभावी किंवा दूषित पाणी पिऊन मृत्यू होतो. अशा परिस्थितीत पक्ष्यांना पाणी देण्याची जबाबदारी माणसांवरच आहे. आपल्या छतावर किंवा घरासमोर आपण असे पाणी ठेऊन आपल्या निसर्गचक्रातील प्रमुख घटक असलेल्या या पक्ष्यांना दिलासा देऊ शकतो. चला तर मग  आज 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त चिऊसाठी एक भांडे पाणी ठेवून तिला वाचविण्याचा संकल्प करू यात.

यासंदर्भात  पक्षीमित्रांनीदेखील नागरिकांचा सहभाग असावा, अशीच अपेक्षा व्यक्त केली. आपल्याप्रमाणे पक्ष्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या पाण्याचे साठे पक्ष्यांकरिता उपलब्ध नाहीत. पूर्वी  सार्वजनिक नळ व्यवस्था होती. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नव्हती. पण, आता ती भटकंतीची वेळ माणसांसह पक्ष्यांवरही आली आहे. यावर उपाय म्हणजे आपण या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे.
वाढते तापमान, प्रदूषित नाले-नद्यांमुळे चिऊताई बरोबर अनेक पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे. 20 मार्च ‘जागतिक चिमणी दिन’ आणि 22 मार्च ‘जागतिक जल दिन’निमित्त आपण सारेच संकल्प करून आपल्या घराच्या बाल्कनीत, टेरेसवर, पाण्याचे  भांडे चिऊताई आणि अशा अनेक तहानलेल्या पक्ष्यांसाठी ठेऊ या. याद्वारे फक्त एका दिवसापुरते नव्हे, तर कायमस्वरूपी पाण्याचे एक भांडे पक्ष्यांसाठी ठेवाच! आपल्या एका छोट्या कृतीमुळे अनेक पक्ष्यांचा जीव वाचेल आणि निसर्गसंवर्धनाला आपलाही हातभार लागेल, असे आवाहन पक्षी प्रेमींनी केले आहे.

No comments:

Post a Comment