Saturday, March 30, 2019

खासदार राजू शेट्टी हॅट्ट्रिक साधणार काय?



शेतकर्यांचे कैवारी खासदार राजू शेट्टी या निवडणुकीत हॅट्ट्रिक साधणार काय, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलेले, खानदानी राजकीय व्यक्तिमत्त्व लाभलेले धैर्यशील माने या निवडणुकीत बलाढ्य पैलवानाबरोबर कुस्ती खेळताना गनिमी काव्याचा वापर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी रंगेल, असे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रीय नेतृत्वाकडे झेप घेतलेले खासदार राजू शेट्टी पुन्हा संसदेत जाणार काय, याबाबत राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघाकडे लक्ष लागून राहिले आहे. पूर्वी इचलकरंजी लोकसभा असलेला मतदार संघ हातकणंगले मतदार संघात विलीन झाल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्यांची मूठ बांधलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सलग दोन वेळा खासदार होत असताना 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार श्रीमती निवेदिता माने यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये भाजपबरोबर सलगी करून खासदार राजू शेट्टी यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दारूण पराभव करून विजयाची माळ घातली. 15 वर्षांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी शेतकर्यांचा प्रचंड विश्वास निर्माण केला आहे. धुरंदर व्यक्तिमत्त्व लाभलेले खासदार राजू शेट्टी राजकारणामध्ये फार चतुर आहेत. केव्हा कोणाबरोबर गट्टी करायची आणि केव्हा कोणाबरोबर पंगा घ्यायचा, हे ते चांगलेच जाणतात. स्वाभिमानीच्या माध्यमातून आजवर दुसरी फळी तयार झाली नसली तरी कार्यकर्ते आजही त्यांच्या पाठीमागून त्यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करतात. आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादीसह मित्रपक्ष त्यांच्या विजयासाठी बांधील असले तरी अजून तरी मतदार संघामध्ये स्वाभिमानी वगळता अन्य पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे जाणवते. पण राजकीय उलतापालथ पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या पाठीमागून जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. शिवसेनेकडे प्रचार यंत्रणा आक्रमक नसली तरी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार राजेश क्षीरसागर अशी मोठी फौज उमेदवार धैर्यशील माने यांच्या पाठीशी आहे. याशिवाय राजू शेट्टींच्या पासून दुखावलेली काही मातब्बर मंडळीसुद्धा शिवसेनेला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सहकार्याने राजू शेट्टी विजयी झाले होते. सत्ताधारी गटात असतानासुद्धा त्यांनी अडीच वर्षांतच सवतासुभा करून भाजपच्या विरोधी रान उठवल्याने भाजपच्या नेतृत्वानेही या मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे कोणीही सांगू शकत नाही. कारण ही निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेचीच बनणार आहे. वंचित बहुजन आघाडी कडून हाजी असलम सय्यद, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, सुरेश पाटील, माजी आमदार संजयसिंग गायकवाड यांच्या भाऊ संग्रामसिंह गायकवाड हेही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणकोणाचे मते खाणार, याचा कुणाला लाभ होणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment